Friday, August 7, 2020
Mumbai
27.8 C
घर महामुंबई वसईच्या केळीवर श्रीलंकेतील माशीचा हल्ला

वसईच्या केळीवर श्रीलंकेतील माशीचा हल्ला

नारळ, सुपारी, मोगराही संकटात

Mumbai
(वसईतील प्रसिद्ध केळ्यांवर रोगाची लागण झाल्याने बागायतदार संकटात सापडले आहेत)

वसईची प्रमुख ओळख असलेल्या प्रसिद्ध केळीला बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे केळीच्या बागांवर याचा मोठा प्रादुर्भाव झाला असून बागायतदारांच्या बागा नष्ट होण्याचा मार्गावर आहेत. बागायतदार हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे. श्रीलंकेतील पांढर्‍या माशीमुंळे हा बुरशीजन्य रोग आल्याचे कृषीतज्ञांचे म्हणणे आहे. हा रोग केळींच्या झाडांसोबत नारळ, सुपारी, मोगरा, टगर तसेच इतर फुलझाडांवरही आल्याचे दिसून येत आहे.

वसईत 100 हेक्टर क्षेत्र परिसरात केळीच्या शेतीची लागवड केली जाते. त्यात प्रामुख्याने वेलची केळी, बिनबोंड, लोखंडी बंगाली, बनकेळ, भूरकेळ, राजेळी अशा विविध प्रजातींच्या केळीची लागवड केली होते. या सर्वच प्रजातींच्या केळीच्या पानांना बुरशीजन्य रोगाने ग्रासले आहे. स्पायरलींग व्हाईट फ्लाय म्हणजेच वर्तुळाकार अंडी घालणार्‍या पांढर्‍या माशांचा प्रादुर्भाव झाला आहे. केळीच्या पानाच्या वरच्या भागाला काळपट थर दिसत असून खालच्या भागावर सफेद बुरशी लागली आहे. त्यामुळे प्रत्येक केळीच्या बागांना त्याचा फटका बसला आहे. यामुळे निव्वळ केळीच्या बागावर आपला उदरनिर्वाह करणारा हा शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.

वसईतील केळी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिकरीत्या वाढवली जातात. त्यामुळे त्यांना वसईसह मुंबईतल्या बाजारपेठांमध्ये मागणी जास्त असते. मात्र यंदा बुरशीजन्य रोग लागल्यामुळे केळीचे उत्पादन फारच कमी होणार असल्याची चिंता अनेक बागायतदारांना सतावत आहे. सध्या वसईचा हरित पट्टा नष्ट होऊ लागल्याने काही ठरवीक ठिकाणीच केळीची लागवड केली जात होती. त्यातच आता केळींना बुरशीजन्य रोग होत असल्याने केळीची शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

गेल्यावर्षी वेलची केळींवर खोडकिडा रोगामुळे केळीची पाने गळून झाडे मेल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून आता सावरत असतानाच बुरशीजन्य रोगाचे मोठे संकट शेतकर्‍यांचे कंबरडे पुरते मोडणार असल्याचे आगाशीतील फरमीन परेरा या प्रगतशील शेतकर्‍याने सांगितले.

झाडांची वाढ खूंटणे,पाने गळणे अशा रोगांचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. रासायनिक किटकनाशकांचा वापर न करता जैविक पद्धतीने यावर उपाययोजना कराव्यात असे आवाहन कृषी अधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे.

जैविक पद्धतीचा वापर केल्यास हा रोग आटोक्यात येऊ शकतो. इतर किटकनाशकांमुळे मित्र किटकांना इजा पोहचू शकते. पाण्याच्या फवारणीनेही हा रोग आटोक्यात येऊ शकतो. या किडीची माशी श्रीलंकेतून आल्याचा अंदाज आहे.
– अंकूर ढाणे, कृषी अधिकारी, पालघर