वाढलेल्या गुणांची सूज उतरली

शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा शेरा

Mumbai
Vinod Tawde
विनोद तावडे

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल कमी लागल्याने पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे, परंतु हा निकाल म्हणजे वाढलेल्या गुणांची सूज कमी होण्याचा प्रकार आहे, असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. या निकालातून विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन होऊन त्याला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर योग्य दिशा दहावीलाच मिळण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 गुण देण्याची 2008 पासून सुरू झालेली पद्धत 2018 पर्यंत होती. २००७ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाची गुणपध्दत नसल्याने शालांत परीक्षेचा निकाल ७८ टक्के लागला होता. त्यानंतर २००८ मध्ये शालांत परीक्षेचा निकाल ८७.४१ टक्के इतका लागला. २००७ च्या तुलनेत सुमारे ९ टक्क्यांनी वाढ झाली. खर्‍या अर्थाने यंदा जो १२.३१ टक्के निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे, तो कमी निकाल म्हणजे वाढलेल्या गुणांची सूज कमी झाली. विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन केल्यास त्याला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर योग्य दिशा दहावीलाच मिळू शकेल. केवळ दहावीला जास्त मार्क मिळाले व उतीर्ण झाल्यानंतर अकरावीला प्रवेश घेऊन पदवीधर व्हायचे आणि बेरोजगारांच्या कारखान्यात दाखल व्हायचे.

यापेक्षा दहावीच्या निकालात विद्यार्थ्यााला त्याची गुणवत्ता कळली तर तो त्या पध्दतीचे करिअर निवडू शकतो. त्यातून विद्यार्थ्याला चांगली संधी मिळू शकेल. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत की, या निकालामुळे निराश होण्याचे कारण नाही. दहावीच्या निकालामधून विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेची दिशा आता कळली असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करा. मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. फेरपरीक्षेसाठी महिन्याभरात चांगला अभ्यास केला तर स्वाभाविकपणे फेरपरीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेता येईल, अन्यथा विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रमाची व्यवस्थासुध्दा केलेली आहे. विद्यार्थी कौशल्याच्या आधारे शिक्षित झाल्यास तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. २०१८-१९ मधील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची विविध बोर्डाची आकडेवारी पाहता, अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची संख्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे यंदा दहावीच्या निकालात कमी गुण मिळाले म्हणून निराश होण्याचे कारण नाही. फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि करिअर निवडण्याची एक संधी मिळाली आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here