वसई ते सावंतवाडी पॅसेजर सुरु करा

वसई-सावंतवाडी पॅसेंजर आणि डहाणू पनवेल ते चिपळूण दरम्यान मेमू रेल्वे सुरू करण्यासाठी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी रविवारी खासदार राजेंद्र गावीत यांची भेट घेतली.

कोकण रेल्वे मार्गावर वसई-सावंतवाडी पॅसेंजर आणि डहाणू पनवेल ते चिपळूण दरम्यान मेमू रेल्वे सुरू करण्यासाठी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी रविवारी खासदार राजेंद्र गावीत यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांची निवेदन गावीत यांना दिले.

रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

वसई, नायगाव, नालासोपारा, विरार ते डहाणू रोडपर्यंत कोकणातील ( सिंधुदुर्ग,रत्नागिरी व रायगड ) लोकवस्ती ही साधारण आठ लाखांच्या घरात आहे. भविष्यात ते प्रमाण वाढत जाणार आहे. या विभागातील लोकांना कोकण रेल्वेसाठी जायचे झाल्यास त्यांना लोकलच्या गर्दीतून दादर किंवा सीएसएमटी स्टेशनला जावे लागते. कोकण रेल्वे मार्गावर उत्तरेतून दक्षिणेकडे जाणार्‍या जलद गतीच्या अनेक रेल्वेगाड्या आहेत, मात्र त्याचा काहीच फायदा होत नाही. या नवीन रेल्वेची मागणी मागील तीन वर्षापासून करण्यात येत आहे. या रेल्वेचा फायदा पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे व हार्बर लाईनवरील सर्व कोकणवासीयांना होईल, तसेच या गाड्या बांद्रा टर्मिनल, मुंबई सेट्रल किंवा वलसाड टर्मिनलवरुन सुरू कराव्यात. त्याचबरोबर नायगाव-ज्यूचंद्र येथील पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणार्‍या फाटकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

मेमू रेल्वे सुरू करा

डहाणू रोड, पनवेल व चिपळूण मार्गावर बोईसर, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा व चिपळूण हा परिसर दाट लोकवस्तीचा असून येथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आहेत. त्यामुळे ह्या मार्गावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते, प्रवाशांच्या तुलनेत मेमू रेल्वे कमी पडत आहेत. त्यामुळे डहाणू पनवेल मेमूच्या फेर्‍या वाढवून ती पुढे चिपळूणपर्यंत नेण्यात यावी. या नवीन रेल्वेमुळे कोकणात जाणार्‍या इतर गाड्यांमधील गर्दीही कमी होईल. सर्वसामान्यांना मेमूचे तिकीट ही परवडेल, अशीसुध्दा मागणी वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटने केली आहे.