१ मेपासून गणेशोत्सव आरक्षण होणार सुरू

यंदा ऑनलाइन आरक्षणावर भर पडणार

Mumbai
रेल्वे

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या भाविकांची मेल-एक्स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग सुरू झाली आहे. यंदा गणरायाचे आगमन 2 सप्टेंबर रोजी होणार असून, रेल्वेच्या नियमानुसार चार महिन्यांअगोदर आरक्षण करता येत आहे. त्यानुसार १ मेपासून हे आरक्षण सुरू होणार आहे. अनेक भाविक, चाकरमानी गणेशोत्सवापूर्वी काही दिवस गावी जात असल्याने त्या तिकिटांचीही मागणी वाढत चालली आहे. यंदा ऑनलाइन आरक्षणावर भर पडणार आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई आणि परिसरातून कोकणात जाणार्‍यांची संख्या प्रचंड असते. खासगी वाहने, एसटी, खासगी बसगाड्यांप्रमाणेच मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची प्रचंड मागणी असते. त्यात रेल्वे प्रवासाला सर्वाधिक पसंती दिली जाते. त्यामुळे कोकण रेल्वेवरून नियमित फेर्‍यांसोबत जादा गाड्या सोडल्या जातात. तिकीट खिडक्यांप्रमाणेच ऑनलाइन तिकीट आरक्षण अक्षरश: दोन मिनिटांत फुल्ल होत असल्याने हजारो प्रवासी या प्रवासासाठी अन्य पर्याय शोधतात. या तिकिटांसाठी डोंबिवली स्थानकात प्रवाशांकडून सहकार तत्त्वाचा अवलंब केला जातो.

आगाऊ तिकिटांसाठी काही दिवस प्रवासी भल्या पहाटेपासून इथे रांग लावतात. त्यासाठी इच्छूक प्रवाशांची एक यादी केली जाते. त्यात प्रवाशांची नावे नोंदवली आहेत. तिकिटे उपलब्ध होण्याच्या कालावधीपर्यंत दररोज तीन ते चार वेळा इच्छूक प्रवासी वा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हजेरी लावणे अपेक्षित आहे. त्यात तिकीट दलालांचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी प्रवासी सर्व संमतीने स्वत:च यादी करतात. या ठिकाणी गोंधळ होऊ नये यासाठी रेल्वे पोलिसांकडून सहकार्य मिळत असल्याचे प्रवासी सांगतात.

प्रवास तिकीट आरक्षणासाठीचा दिवस
१ मे, बुधवार – २९ ऑगस्ट, गुरुवार
२ मे, गुरुवार – ३० ऑगस्ट, शुक्रवार
३ मे, शुक्रवार – ३१ ऑगस्ट, शनिवार
४ मे, शनिवार – ०१ सप्टेंबर, रविवार (हरतालिका)
५ मे, रविवार – ०२ सप्टेंबर, सोमवार (श्री गणपतीचे आगमन)
६ मे, सोमवार – ०३ सप्टेंबर, मंगळवार (दीड दिवस गणपतीचे विसर्जन)
७ मे, मंगळवार – ०४ सप्टेंबर, बुधवार
८ मे, बुधवार -०५ सप्टेंबर, गुरुवार (गौरी आगमन)
९ मे, गुरुवार – ०६ सप्टेंबर, शुक्रवार
१० मे, शुक्रवार – ०७ सप्टेंबर, शनिवार (पाच दिवसांचे गणपती व गौरींचे विसर्जन)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here