मुंबईही सोमवारपासून मेट्रो धावणार, हे आहेत नवे बदल

केंद्र सरकारच्या अनलॉक मार्गदर्शकानुसार आता महाराष्ट्र सरकारनेही १५ ऑक्टोबरपासून काही सेवा अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मेट्रो सेवा सुरू करण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे. जवळपास ६ महिन्यानंतर मेट्रोची सेवा मुंबईत सुरू होईल. मुंबई मेट्रो लाईन १ अंतर्गत घाटकोपर- अंधेरी- वर्सोवा दरम्यानची सेवा येत्या १९ ऑक्टोबरपासून सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

राज्य सरकारने ही परवानगी देतानाच मास्कचा वापर हा अतिशय काटेकोरपणे होईल असे बजावले आहे. सार्वजनिक जागांवर सर्व खबदारी घेतच लोकल सेवा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुक उपक्रमातील सेवा गेल्या दोन महिन्यांहून अधिक कालावधीसाठी बंद आहे. पण आता मुंबईतील स्थिती पूर्ववत होत असल्यानेच पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतूकीची सुविधा सुरू होण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. मेट्रो सेवा पुन्हा एकदा सेवेसाठी सज्ज होत आहे. आगामी कालावधीत मात्र मोनोरेल आणि लोकलची सेवा सुरू होणे अपेक्षित आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मेट्रो १ या सेवा सुरू करण्यासाठीची तयारी सध्या करत आहे.

मेट्रो १ मार्फतही क्यूआर कोड तिकिट आणि पेपर तिकिट देण्याची सुरूवात होणे अपेक्षित आहे. प्लॅस्टिक टोकन देण्याएवजी पेपर तिकिटाचा वापर सुरू करण्यासाठी मेट्रो १ ने पुढाकार घेतला आहे. जेव्हा सुरू होतील तेव्हा मेट्रोच्या डब्यांमधील प्रवाशांची संख्यादेखील कमी होणार आहे. लॉकडाऊनआधी सरासरी ४०० लोक एका मेट्रोच्या डब्यातून प्रवास करत होते. तर लॉकडाऊननंतर मात्र एका डब्यात १०० प्रवासी बसतील. तर ७५ जणांनाच उभे राहून प्रवास करण्याची मुभा असेल.