घरमुंबईहोमिओपॅथी डॉक्टरांवर राज्य सरकारचा अविश्वास

होमिओपॅथी डॉक्टरांवर राज्य सरकारचा अविश्वास

Subscribe

वारंवार पत्र पाठवूनही करोना सेवेत सामावून घेण्याकडे दुर्लक्ष

होमिओपॅथी औषध असलेल्या आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे करोना प्रतिबंधक म्हणून सार्‍या राजत्यात वाटप सुरु आहे. करोना लढ्यात सरकारला होमिओपॅथी औषध चालत आहे, पण उपचारासाठी होमिओपॅथी डॉक्टरांवर अविश्वास दाखवण्यात येत आहे. होमिओपॅथी उपचार पद्धतीमधील डॉक्टरांना करोना लढ्यात सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीकडून सरकारला दोन महिन्यांपासून वारंवार पत्र पाठवण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कौन्सिलकडून खेद व्यक्त करण्यात येत आहे.

२०० वर्षांपासून आपल्या देशात अस्तित्त्वात असलेल्या होमिओपॅथी भारतीय उपचार पद्धतीवर जगातील अनेक देशांचा विश्वास आहे. सध्या जगभरात थैमान घातलेल्या करोनावर औषध शोधण्यात अद्यापही शास्त्रज्ञांना यश येत नसताना होमिओपॅथी उपचार पद्धतीमधील आर्सेनिक अल्बम ३० हे औषध प्रतिबंधक म्हणून वापरण्यात येत आहे. याची दखल संपूर्ण देशांने घेत नागरिकांना या गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहेत.

- Advertisement -

गुजरात, कर्नाटक, गोवा, दिल्ली यासारख्या राज्यांनी होमिओपॅथी डॉक्टरांची मदत घेत करोनाला आटोक्यात आणण्यास प्रयत्न सुरु केले असून त्यात त्यांना यशही मिळत आहे. होमिओपॅथी डॉक्टरांचे सहकार्य घेण्यात यावे यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीकडून राज्य सरकारला वारंवार पत्र पाठवण्यात येत आहेत. आरोग्य मंत्री, मुख्य सचिव आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला कौन्सिलकडून पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र कौन्सिलच्या पत्राकडे सरकारी स्तरावरून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

मुंबईमध्ये जवळपास १० हजार होमिओपॅथी डॉक्टर असून हे सर्व कोरोना रुग्णांची सेवा करण्यास तयार आहेत. महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारला डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक यांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांची मदत कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर, क्वारंटाईन सेंटर येथे घेण्यात येऊ शकते. परिणामी सध्या सेवेत असलेल्या मनुष्यबळाला विश्रांती मिळू शकेल. या भावनेतून महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

- Advertisement -

यासंदर्भात करोना टास्क फोर्सचे प्रमुख आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी होमिओपॅथी डॉक्टरांचे सहकार्य घेण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले.

होमिओपॅथी डॉक्टरांचे सहकार्य घ्यावे यासाठी आम्ही सरकारला आमच्या डॉक्टरांची यादी दिली आहे. परंतु जळगाव आणि अंबरनाथ वगळता सरकारकडून आमच्या डॉक्टरांचे सहकार्य घेण्यात आलेले नाही. गरजेच्या ठिकाणी अद्यापही होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
– डॉ. नितीन गावडे, अध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -