घरमुंबईइंद्रधनुष्य’ वर मुंबई विद्यापीठाची विजयी पताका

इंद्रधनुष्य’ वर मुंबई विद्यापीठाची विजयी पताका

Subscribe

तब्बल १६ वेळा चषकावर कोरले नाव

१७ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ मध्ये मुंबई विद्यापीठाने बाजी मारली आहे. २ ते ६ डिसेंबर २०१९ दरम्यान गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या या युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर उमटली आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत मुंबई विद्यापीठाने तब्बल १६ वेळा हा चषक आपल्याकडे राखण्याचा बहुमान मिळविला आहे. वाडमय, संगीत, नाट्य आणि नृत्य या स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने ८३ गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेते पद मिळवून अव्वलस्थान पटकावलं आहे. तर द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यापीठास ५२ गुण मिळाले आहेत. या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये राज्यातील सर्व २० विद्यापीठे सहभागी झाली होती.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, संगीत – शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय स्वर वाद्य, पाश्चिमात्य एकल गायन, नाट्य विभाग – प्रहसन, मुकनाट्य, नृत्य विभाग – शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य या विभागांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. यासोबत विविध विभागात प्राविण्य मिळविले आहे. विशेष म्हणजे सुजेश मेनन याला गोल्डन बॉय तर कुमारी सानिका पंचभाई या विद्यार्थीनीला गोल्डन गर्लचे पारितोषिक देऊन भूषविण्यात आले.

- Advertisement -

ललितकला विभागासाठी डॉ. बालाजी भांगे, संगीत विभागासाठी सुमित चाचे, विजय जाधव, साहिल जोशी, मैत्रेय जोशी, साहित्य विभागासाठी वरुन सुरेश, नाट्य विभागासाठी हेमंत भालेकर , महेश कापरेकर, सागर चव्हाण, नृत्य विभागासाठी वैभव सतरंगे, अमोल बावकर, या सर्वांचे सहकार्य लाभले असून सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी यशस्वीरित्या या स्पर्धेचे नियोजन केले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी विजयी चमुचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -