घरमुंबईविनयभंग प्रकरणी विद्यार्थी संघटना आक्रमक

विनयभंग प्रकरणी विद्यार्थी संघटना आक्रमक

Subscribe

मुंबई विद्यापीठात दिवसाढवळ्या घडलेल्या विनयभंगाच्या प्रकार गुरुवारी आपलं महानगरने प्रकाशात आणला. महानगरच्या वृत्तानंतर विद्यापीठाच्या कलिना आणि फोर्ट कॅम्पसमध्ये खळबळ उडाली. या वृत्तानंतर विद्यार्थी सुरक्षेच्या मुद्यावर जवळपास सर्वच विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले आहे.

मुंबई विद्यापीठात दिवसाढवळ्या घडलेल्या विनयभंगाच्या प्रकार गुरुवारी आपलं महानगरने प्रकाशात आणला. महानगरच्या वृत्तानंतर विद्यापीठाच्या कलिना आणि फोर्ट कॅम्पसमध्ये खळबळ उडाली. या वृत्तानंतर विद्यार्थी सुरक्षेच्या मुद्यावर जवळपास सर्वच विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले आहे. तर अनेक विद्यार्थी संघटनांनी याप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करीत या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कलिना कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात प्रशासनाने हालचाली सुरु केल्याचेही अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पस येथील रानडे भवनात भल्या सकाळी एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचे वृत्त ‘आपलं महानगर’ने ९ ऑगस्ट रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर मुंबई विद्यापीठातील प्रशासन खडबडून जागे झाले असून गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीसीटीव्हीचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरु झाल्याची माहिती हाती आली आहे. विद्यार्थी संघटनांनी या प्रश्नावरुन प्रशासनावर टीकेची झोड उठविली असून वारंवार सिनेट सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतरही विद्यापीठाने याकडे दुर्लक्ष केल्याची टीका अनेक सिनेट सदस्यांकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे चेतन पेडणेकर म्हणाले की, हा अत्यंत भयंकर प्रकार आहे. विद्यार्थी विद्यापीठावर विश्वास ठेवून येत असतात. जर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर नक्कीच याने विद्यापीठाची अब्रु वेशीवर टांगली जाईल, त्यामुळे विद्यापीठाने हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करताना या प्रश्नी शिक्षणमंत्र्यांनी देखील हस्तक्षेप करण्याची मार्गी त्यांनी यावेळी केली. याबद्दल एसएफआयने देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे. सीसीटीव्हीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून यासंदर्भात विद्यापीठाने त्वरीत मार्ग न काढल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असे एसएफआयने सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने देखील या प्रश्नी चिंता व्यक्त केली आहे. या प्रश्नी लवकरच कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. अमोल मातेले यांनी दिली.

गस्तींमध्ये वाढ
‘आपलं महानगर’च्या या वृत्तानंतर विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. गुरुवारी दिवसभर संपूर्ण कॅम्पसमध्ये सुरक्षा अधिकार्‍यांच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती कॅम्पसमधील सुत्रांनी दिली. तर सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात ही गुरुवारी प्रशासनाची महत्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहिती विद्यापीठाच्या एका अधिकार्‍याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -