आयडॉल परीक्षेच्या गोंधळावरून विद्यार्थी संघटना आक्रमक

या प्रकरणी त्वरित शोध समिती स्थापन करून चौकशी करावी व दोषी अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, कंपनीचे मानधन थांबण्याची मागणी

idol

दूरस्थ व मुक्त अध्ययन शिक्षण संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या आर्ट्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मंगळवारी तांत्रिक अडचणीचे कारण देत मुंबई विद्यापीठाने अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गोंधळाला जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच कंपनीचे मानधन थांबवण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी संघटनांकडून देण्यात आला आहे.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम व द्वितीय वर्ष आणि एटीकेटीच्या परीक्षा कॉलेजांनी त्यांच्या स्तरावर घेतल्याने त्या सुरळीत पार पडल्या आहेत. ३ ऑक्टोबरपासून विद्यापीठाच्या विविध विभाग आणि दूरस्थ शिक्षणाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षेच्या पहिल्याच दिवसापासून ऑनलाईन परीक्षांमध्ये गोंधळ उडत आहे. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेची लिंक उपलब्ध न झाल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. ही परीक्षा एमसीक्यू पद्धतीने होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने एका कंपनीसोबत करार करून तिला ऑनलाईन परीक्षा घेण्याचे काम दिले आहे. परंतु सलग होत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे ही कंपनी परीक्षा घेण्यास असमर्थ ठरत आहे. तसेच कंपनीकडे ऑनलाईन परीक्षा घेण्याचा कोणताही अनुभव नसतानाही विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे काम दिले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भावनेशी विद्यापीठ खेळत आहे. कॉलेज बंद पडल्यानंतर सहा महिन्यांनतर विद्यार्थी सांशक मनाने परीक्षेला सामोरे जात आहेत. विद्यापीठाच्या गोंधळामुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जाऊन जीवाचे बरे वाईट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी त्वरित शोध समिती स्थापन करून चौकशी करावी व दोषी अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, अ‍ॅड. वैभव थोरात, डॉ. सुप्रिया करंडे, डॉ. धनराज कोहचाडे यांनी केली.

कंपनीसोबतचा करार रद्द करा

विद्यार्थी व पालकांना कोविड काळात प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कंपनीसोबत केलेला करार रद्द करण्यात यावा. तसेच आतापर्यंत केलेल्या कामाची कंपनी कोणतीही रक्कम अदा करू नये. अन्यथा विद्यार्थ्यांवर होणार्‍या अन्यायाबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष संतोष धोत्रे आणि सरचिटणीस संतोष गांगुर्डे यांनी दिला आहे.