घरमुंबईपेंढारकर महाविद्यालयाविरोधात विद्यार्थ्यांची निदर्शने; पोलिसांकडून धरपकड

पेंढारकर महाविद्यालयाविरोधात विद्यार्थ्यांची निदर्शने; पोलिसांकडून धरपकड

Subscribe

डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या वाढीव फी आणि भोंगळ कारभाराविरोधात मंगळवारी विद्यार्थी भारती संघटनेने महाविद्यालयाबाहेर निदशने करून आंदोलन केलं.

डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या वाढीव फी आणि भोंगळ कारभाराविरोधात मंगळवारी विद्यार्थी भारती संघटनेने महाविद्यालयाबाहेर निदशने करून आंदोलन केलं. यावेळी महाविद्यालयाचे विश्वस्त प्रभाकर देसाई यांना भिकारी पुरस्कार देण्याचा प्रयत्न विद्यार्थी संघटनेने केला. मात्र महाविद्यालयाच्या गेटबाहेरच विद्याथ्यांना अडवून ठेवण्यात आले होते. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं… कोण म्हणतंय देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय…, अशा अनेक घोषणांनी पेंढरकर महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांनी दणाणून सोडला. मात्र निदर्शन करणाऱ्या विद्याथ्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना पेालिसांनी ताब्यात घेऊन त्यानंतर सोडून दिले. मात्र पोलिसांच्या कृतीचा विद्यार्थ्यांनी निषेध केला.

महाविद्यालयाच्या वाढीव फी विरोधात तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. विश्वस्त प्रभाकर देसाई यांची भेट मागितली होती. मात्र त्यांनी भेट नाकारली. शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनीही महाविद्यालयाकडे अहवाल मागितला असून अजून मिळाला नसल्याचे सांगितले. महाविद्यालयात देसाई यांचा मनमानी कारभार सुरू आहे. ते शासनालाही जुमानत नाहीत. देसाई हे स्वतः महाविद्यालयाच्या आवारात येऊन विद्यार्थिनींच्या हातून मोबाईल खेचतात आणि यातून देखील ५०० रुपये उकळण्याचे प्रकार होत असतात. विद्यार्थ्यांकडून प्रत्येक बाबींसाठी पैसे उकळले जात असल्याने देसाई यांना भिकारी पुरस्कार देण्याचे ठरवले. प्रशासनाकडून दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल.
– मंजिरी धुरी, राज्याध्यक्षा, विद्यार्थी भारती संघटना

- Advertisement -

विद्यार्थ्यांची अटक व सुटका 

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराबाबत विद्यार्थी भारती संघटना अनेक दिवसांपासून लढा देत आहे. पेंढरकर महाविद्यालयात प्रत्येक शैक्षणिक कामकाजामागे अव्वाच्या सव्वा शुल्क आकारली जात असल्याने त्या विरोधात मंगळवारी विद्यार्थी भारती संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांना महाविद्यालय गेट बाहेरच अडवण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी विश्वस्त प्रभाकर देसाई यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. देसाई यांना भिकारी पुरस्कार देण्यासाठी त्यांनी पुरस्काराचं स्मृतिचिन्ह बनवून आणलं होत. मात्र विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या गेटवर अडवल्याने देसाई यांना पुरस्कार देण्याचा प्रयत्न असफल ठरला. यावेळी पोलीस आणि विद्यार्थी यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाले. मानपाडा पोलिसांनी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात आणून नंतर सोडून दिले. विद्यार्थी भारतीचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत विद्यार्थ्यांची बाजू मांडली. देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थांनी पोलिसांकडे केली. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेली वाढीव फी परत करावी तसेच महाविद्यालयात प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी भारतीचे राज्य सचिव जितेश पाटील यांनी केली. देसाईंना पगार कमी पडतो का? तर मुलांच्या खिशातून पैसे उकळतात असा सवाल विद्यार्थी भारतीच्या राज्य विद्यापीठ अध्यक्ष पूजा मूधाणे यांनी केला. शासनाने या प्रकरणाची लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा विद्यार्थी भारती तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा विद्यार्थी भारतीच्या राज्य कार्यवाह साक्षी भेाईर आणि श्रेया निकाळजे यांनी दिला. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

माझ्यावरील केलेले सर्व आरोप हे खोटे आहेत. महाविद्यालयाकडून कोणतही बेकायदेशीर काम केलं जात नाही. विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्यानंतर त्याची पावती दिली जाते. कॉलेजमधील दोन विद्याथ्यांना बरोबर घेऊन कॉलेज विरूध्द त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आंदोलनात आमच्या कॉलेज मधील केवळ दोन विद्यार्थी सहभागी झाले होते. उर्वरीत सर्व बाहेरील विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांची भेट घेतली नाही. कॉलेजमधील सर्व विद्यार्थी माझयाबरोबर आहेत.
– प्रभाकर देसाई, विश्वस्त पेंढारकर महाविद्यालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -