घरमुंबईविद्यापीठाला मराठीचे वावडे

विद्यापीठाला मराठीचे वावडे

Subscribe

पीएचडीच्या इंग्रजी प्रबंधामुळे विद्यार्थ्यांना फटका

 राज्य सरकारकडून सरकारी कामकाजात मराठीचा वापर सक्तीचा केला असताना व पीएचडीसाठी विषय मान्यतेचा प्रस्ताव, प्रबंधाच्या सारांशासाठी इंग्रजी भाषेची आवश्यकता नसल्याचा ठराव विद्यापीठाच्या अधिसभेत मंजूर केला असतानाही मुंबई विद्यापीठाला मराठी भाषेचे वावडे असल्याचे दिसून येत आहे. पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांना मान्यतेचा प्रस्ताव, प्रबंध सारांश व प्रबंधाचा 10 टक्के भाग इंग्रजीमधून सादर करावा लागतो. त्यामुळे मराठीचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी या विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो.

मराठी भाषेतून संशोधन होण्याबरोबरच प्रबंध सादर व्हावेत, असे मत अनेक शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येते. परंतु, मुंबईपासून थेट सिंधुदुर्गापर्यंत आवाका असलेल्या मुंबई विद्यापीठातून दरवर्षी अनेक विद्यार्थी पीएचडीसाठी अर्ज करतात. पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्याला नाव नोंदणी करण्यासाठी विषय मान्यता प्रस्ताव मराठीसोबत इंग्रजीमध्ये द्यावा लागतो. त्यानंतर प्रबंधाचा सारांश व प्रबंधाचा 10 टक्के भाग हा इंग्रजीमधून द्यावा लागतो. त्यासाठी मराठीमधून पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांना जवळपास 100 पानांचे भाषांतर करावे लागते. ही पाने भाषांतर करताना भाषांतरकाराला प्रतिशब्द किमान एक रुपया तर एका पानासाठी 300 ते 350 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे 100 पानांसाठी विद्यार्थ्यांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत. ग्रामीण भागात पीएचडी करणार्‍या हजारो विद्यार्थ्यांना हा आर्थिक फटका सहन करावा लागतो.

- Advertisement -

मराठी माध्यमांच्या पीएचडी विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत चार वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावात मराठी माध्यमातून पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांकडून विषय मान्यता प्रस्ताव, प्रबंधाचा सारांश आणि प्रबंधाचा 10 टक्के भाग इंग्रजी भाषांतर करून घेऊ नये. इंग्रजी भाषांतराची आवश्यकता नाही. पण, या ठरावाची अंमलबजावणी विद्यापीठ प्रशासनाने अद्याप केलेली नाही. परिणामी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पीएचडी करण्याचा विचार सोडून देत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होत असलेली ही गळचेपी रोखण्यासाठी इंग्रजी भाषांतराच्या जाचक अटीतून त्वरित काढून टाकावी, अशी मागणी युवा सेनेच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी प्र कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना निवेदन देऊन केल्याची माहिती युवा सेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -