घरमुंबईपोलीस महासंचालकपदी सुबोध जयस्वाल तर मुंबई पोलीसआयुक्तपदी संजय बर्वे ?

पोलीस महासंचालकपदी सुबोध जयस्वाल तर मुंबई पोलीसआयुक्तपदी संजय बर्वे ?

Subscribe

केंद्र सरकारने मुदतवाढीचा प्रस्ताव नाकारल्याने राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. पडसलगीकर यांच्या निवृत्तीनंतर रिक्त होणार्‍या राज्याच्या पोलीस महासंचालक या पदावर सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या मुंबई पोलीस आयुक्तपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख संजय बर्वे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच पोलीस महानिरीक्षक (कावसु) परमवीरसिंह यांना मुंबईचे पोलीस आयुक्त होण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.

पोलीस दलात प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले दत्ता पडसलगीकर हे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त झाले होते. मात्र त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. नोव्हेंबर अखेरीस त्यांची मुदतवाढ संपल्याने राज्य शासनाने त्यांना आणखी तीन महिन्याची मुदतवाढ दिली होती. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस त्यांचा मुदतवाढीचा कार्यकाळ समाप्त होत असल्यामुळे राज्य शासनाने त्यांना आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्यात यावी म्हणून केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. या मुदतवाढीविरोधात अडव्होकेट आर.आर.त्रिपाठी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पडसलगीकर यांना मुदतवाढीबाबत केंद्र शासनाने महिन्याभरात निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले होते. दरम्यान केंद्रातून पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना दोन वर्षाची मुदतवाढीचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पडसलगीकर हे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत.

- Advertisement -

पोलीस सेवेत सर्वात ज्येष्ठ असणारे मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे. जयस्वाल १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांचा कार्यकाल २०२२ ला संपत आहे. जयस्वाल यांच्या महासंचालकपदावरील नियुक्तीनंतर रिक्त होणार्‍या मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत असणार्‍या अधिकार्‍यांपैकी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख संजय बर्वे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजते. बर्वे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांना यापूर्वी अनेक वेळा डावलण्यात आले होते.

संजय बर्वे हे ऑगस्ट २०१९ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदी बसवून त्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत राज्याचे पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) परमवीर सिंह, हेमंत नागराळे हे देखील आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -