Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईमध्ये कोरोना लसीकरण मोहीमेचे यशस्वी ड्राय रन

मुंबईमध्ये कोरोना लसीकरण मोहीमेचे यशस्वी ड्राय रन

ड्राय रनमध्ये राजावाडी रुग्णालय, बीकेसी कोविड सेंटर आणि कूपर रुग्णालयात प्रत्येकी २५ रुग्णालय कर्मचार्‍यांसोबत ड्राय रन करण्यात आली. मुंबईतील प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिवसाला एक हजार जणांना कोरोनाची लस देण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार शुक्रवारी मुंबईमध्ये तीन ठिकाणी कोविड चाचणीची यशस्वी ‘ड्राय रन’ मोहीम घेण्यात आली. ड्राय रनमध्ये राजावाडी रुग्णालय, बीकेसी कोविड सेंटर आणि कूपर रुग्णालयात प्रत्येकी २५ रुग्णालय कर्मचार्‍यांसोबत ड्राय रन करण्यात आली. मुंबईतील प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिवसाला एक हजार जणांना कोरोनाची लस देण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले असून, लसीकरण मोहीमेसाठी पालिका सज्ज असल्याचे ड्राय रनमधून दिसून आले.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईत तीन ठिकाणी ड्राय रन करण्यात आला. बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये या ड्राय रनचा शुभारंभ महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा प्रवीणा मोरजकर, केंद्र शासनाचे प्रतिनिधी डॉ. सुधीर वंजे, बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. राजेश डेरे उपस्थित होते. बीकेसी कोविड सेंटरमध्ये शुभारंभ झाल्यानंतर राजावाडी व कूपर रुग्णालयात सकाळी ९ वाजता ड्राय रनला सुरुवात झाली. ‘कोविन’ अ‍ॅपद्वारे नोंदणी केलेल्या कोरोना योद्ध्यांना यावेळी लस देण्याचे प्रात्याक्षिक केले. नोंदणी केलेल्या कर्मचार्‍यांची तपासणी करून त्यांना टोकन दिले. त्यानंतर त्यांना लसीकरण केंद्रामध्ये प्रवेश देण्यापूर्वी त्यांना ओळख परेड करण्यात आली. लसीकरण केल्यानंतरही कोरोना योद्धा असलेल्या कर्मचार्‍यांना पुढील अर्धा तास डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतरच त्यांना सोडण्यात आले. ड्राय रनवेळी कोणतीही अडचण आली नसल्याने तिन्ही ठिकाणी यशस्वी प्रात्याक्षिक झाले. कोविडचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नसून ब्रिटनचा जीवघेणा विषाणू लक्षात घेता प्रत्येक मुंबईकर नागरिकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. लसीकरणामुळे आपण या विषाणूशी चांगल्याप्रकारे लढा देण्यास सज्ज राहू असा विश्वासही महापौरांनी यावेळी व्यक्त केला.

असे होते लसीकरण

- Advertisement -

लसीकरणासाठी केंद्र सरकारने बनवलेल्या ‘कोविन’ अ‍ॅपमध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तीला लसीकरणासाठी एसएमएस पाठवण्यात येते. एसएमएस मिळालेली व्यक्ती लसीकरण केंद्रात आल्यानंतर प्रथम त्याचे तापमान मोजण्यात येऊन निर्जंतुकीकरण करण्यात येते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला निरीक्षण रूममध्ये बसविल्यानंतर त्या ठिकाणी तीन वेळा त्याची ओळख तपासणी केली जाते. यावेळी त्या व्यक्तीचे आधारकार्ड, पॅनकार्ड असे ओळखपत्र तपासण्यात येते. मुंबई महापालिकेतर्फे एसएमएस पाठविलेली व्यक्ती हीच आहे का? याची शहानिशा केली जाते. त्यानंतर लसीकरण करण्यात येते. संबंधित व्यक्तीचे लसीकरण झाल्यानंतर तिला १५ मिनिटे ते अर्धा तासापर्यंत डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येते.

आपत्कालीन यंत्रणा सतर्क

लसीकरणानंतर थोडे जरी त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटले तर याठिकाणी आपत्कालीन व्यवस्था म्हणून आपत्कालीन रूम सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच आपत्कालीन स्थितीत आवश्यक असलेली सर्व प्रकारची इंजेक्शन या आपत्कालीन कक्षात उपलब्ध केले होते.

प्रत्येक केंद्रावर हजार जणांना देणार लस

- Advertisement -

मुंबईमध्ये सध्या तीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांवर दररोज एक हजार कोरोना योद्धांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबई महापालिकेचे रुग्णालयातील कोरोना योद्धा असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या ही ६० हजारांच्या घरात आहे. या सर्वांना लसीकरण सुरू झाल्यावर या तीन केंद्रांवर लस देण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी ९ ते २ आणि दुपारी २ ते ५ या दोन टप्प्यात हे लसीकरण होणार आहे.

- Advertisement -