मुंबई सेंट्रल स्थानकाला ताडपत्रीचा आधार

आयएसओ प्रमाणपत्राची थट्टा

Mumbai

पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेट्रल रेल्वे स्थानकावर पक्के छत घालण्याऐवजी ताडपत्री टाकून प्रवाशांच्या सुरक्षेची थट्टा करण्यात येत आहे. आयएसओ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेल्या या स्थानकाची अवस्था पाहून प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. ही अवस्था असेल तर स्थानकाला आयएसओ प्रमाणपत्र मिळालेच कसे असा सवाल प्रवासी विचारत आहेत.

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर नेहमी प्रवाशांची गर्दी, अस्वच्छता, तिकिटांसाठी लांबच लांब रांगा हा मुंबईकरांसाठी नवा विषय नाही. मात्र आता एक नवीन विषय चर्चेत आला आहे. मुंबई सेट्रल रेल्वे स्थानक नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणपूरकतेच्या तब्बल १२ कसोट्यांना पात्र ठरले आहे. त्यामुळे स्थानकाला आयएसओ १४००१ : २०१५ या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे. मात्र प्रवाशांना काही वेगळाच अनुभव येत आहे. कारण मागील काही महिन्यापासून रेल्वे स्थानकाला पक्के छत नाही. त्याऐवजी ताडपत्री टाकण्यात आली आहे. या संबंधी अनेक तक्रारी करूनही रेल्वे प्रशासन त्याची दखल घेत नाही. त्यामुळे अशा स्थानकाला आयएसओ प्रमाणपत्र मिळालेच कसे, याविषयी प्रवासी शंका उपस्थित करत आहेत.

रेल्वे स्थानकातील छतदुरुस्तीचे काम उन्हाळ्यात सुरू करण्यात आले होते. मात्र निश्चित वेळमर्यादेत हे काम पूर्ण न झाल्यामुळे रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकावर पत्र्यांऐवजी ताडपत्रीने आवरण घातले. काही दिवसांपूर्वीच चर्चगेट येथे सोसाट्याच्या वार्‍यामुळे गांधीजींच्या चित्राचा भाग कोसळला. त्यात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. आता पत्र्याऐवजी वापरलेल्या ताडपत्रीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जोरदार वार्‍यात ताडपत्रीचा टिकाव लागणार नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क गजानन महतपूरकर यांच्याशी संपर्क केला असल्याचं त्यांनी यावर काही बोलण्यास नकार दिला आहेत.

जेव्हा आयएसओची टीम रेल्वे स्थानकावर आली होती,तेव्हा पश्चिम रेल्वेने पूर्ण तयारी केली होती. मात्र पावसाळा आल्यावर तशी तयारी का केली नाही? जर रेल्वे स्थानकावर छताच्या दुरस्तीचे काम वेळेत पूर्ण केले असते तर आज पत्र्यांएवजी ताडपत्रीने रेल्वे स्थानक झाकण्याची नामुष्की पश्चिम रेल्वेवर आली नसती.
– सुभाष गुप्ता,अध्यक्ष, रेल यात्री परिषद