घरमुंबईस्टेपलरने जोडलेल्या अंगठ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

स्टेपलरने जोडलेल्या अंगठ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Subscribe

नालासोपाऱ्यातील एका ३८ वर्षीय व्यक्तीवर अंगठा पूर्ववत करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आलं आहे.

नालासोपाऱ्यातील एका ३८ वर्षीय व्यक्तीवर अंगठा पूर्ववत करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आलं आहे. आपल्या दोन्ही हाताचे अंगठे हे आपल्या रोजच्या दैनंदिन कामकाजात फारच महत्वाची भूमिका बजावत असतात. असाच एक अनुभव नालासोपाऱ्यातील एका व्यक्तीला आला.

नालासोपाऱ्यात राहणारे ३८ वर्षीय मुरलीधर तावडे (बदललेले नाव) यांच्या अंगठ्याला काम करत असताना अचानक दुखापत झाली. डिसेंबर २०१८ मध्ये नालासोपाऱ्यात भरलेल्या एका सत्संग मेळाव्यात त्यांनी तिथे आलेल्या भाविकांसाठी जेवण बनवण्याची जबाबदारी घेतली आणि जेवण करताना चुकीने भाजी चिरताना त्यांचा डाव्या हाताचा अंगठा कापला गेला होता. त्यांच्या हाताचा अंगठा हा पूर्णपणे वेगळा झाला नव्हता तर तो त्वचेच्या सहाय्याने लोंबकळत होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. जर कापलेला अंगठा हा त्याच्या मूळ जागेवर दाबून ठेवला तर तो लवकर जोडला जाईल, असं तिथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने सांगितले. त्यानुसार, स्टेपलरच्या पिनाने तो अंगठा जोडण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

रक्तस्राव जास्त झाल्यामुळे आणि अपघात झालेल्या ठिकाणी प्राथमिक उपचाराला झालेल्या विलंबामुळे ते बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्या अंगठ्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांच्यावर सलग सहा तासांची कठीण शस्त्रक्रिया केली. दोन महिन्यानंतर तावडे यांच्या अंगठ्याची हालचाल सुरू झाली असून गेल्याच आठवड्यात अंगठ्याच्या ५० टक्के संवेदना परत आल्या असून पुढील एक ते दोन महिन्यात त्यांचा अंगठा पूर्ववत होईल.

अशा केसमध्ये पाच ते सहा तासाच्या आत उपचार झाले तर रुग्ण हा पूर्णपणे बरा होतो पण, त्या पेशंटला मधुमेह, उच्च रक्तदाब असेल अथवा धूम्रपान तसंच मद्यपानाच्या सवयी असतील तर अनेकवेळा छोट्या रक्तवाहिन्या या ब्लॉक होतात आणि त्यामुळे उपचार करण्यावर निर्बंध येतात. स्टेपलर पिन अथवा दुसऱ्या कोणत्याही साहित्याने कापलेला अथवा तुटलेला अवयव जोडण्याचा प्रयत्न करू नये, त्यामुळे जंतुसंसर्ग वाढण्याचा धोका असतो.
– डॉ. लीना जैन, शल्यचिकित्सक (प्लास्टिक आणि मायक्रोव्हॅस्कुलर), वोक्हार्ट हॉस्पिटल

- Advertisement -

अशी केली शस्त्रक्रिया

या केसमध्ये अंगठ्याच्या मागील पृष्ठभागावरील नसांची पुनर्बांधणी केली गेली. अशा केसमध्ये विस्तारक कंद आणि नसा अशा दोन धमन्यांची दुरुस्ती करणे फार आवश्यक असते. तसंच, फ्लेक्सर टेंडन आणि तंत्रिका यांची पुनर्बांधणी करण्यात आली. अशा केसमध्ये जोडलेल्या अवयवास हालचाल होण्यास किमान २ ते ३ महिने जातात. तसंच, पूर्ण संवेदना येण्यास ४ ते ५ महिन्याचा वेळ लागतो.

वोक्हार्ट हॉस्पिटलच्या प्लास्टिक आणि मायक्रोव्हॅस्कुलर शल्यचिकित्सक डॉ. लीना जैन यांनी सांगितलं, या केसमध्ये अंगठा कापल्यानंतर तीन तासांनी हा पेशंट वोक्हार्ट हॉस्पिटमध्ये आला. अशा अपघातानंतर रक्त पुरवठा करणाऱ्या अनेक रक्तवाहिन्या मृत होतात. तसंच, कापलेला भाग उघडा राहिल्यामुळे जंतुसंसर्ग वाढत जातो. त्यामुळे शस्त्रक्रिया करणं कठीण होऊ शकतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -