घरमुंबईशहापूरमध्ये आदिवासी विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू

शहापूरमध्ये आदिवासी विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू

Subscribe

शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या शेणवे आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मृत्यूप्रकरणी वासिंद पोलीस ठाण्यात प्राथमिक तक्रार नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या आदिवासी मुलीच्या संशयास्पद मृत्युच्या घटनेने शहापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत वासिंद पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनूसार, शेणवे येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात  शिकत असलेली आदिवासी विद्यार्थीनी अंजली गुरुनाथ पारधी (वय १६) ही गणेशोत्सवाच्या सुट्टीसाठी तालुक्यातील रास येथे आपल्या गावी घरी गेली होती. दरम्यान, अंजलीने ११ सप्टेंबर रोजी राहत्या घरात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजलीचे वडील गुरुनाथ सखाराम पारधी यांनी या घटनेची माहिती पोलिसांत न देता परस्पररीत्या अंजीलीच्या मृतदेह दफन केला. हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असून  याबाबत तात्काळ चौकशी करावी, अशी माहिती रास येथील बाळू मंगल बरोरा यांनी वासिंद पोलीस ठाण्यात दिली आहे.

आदिवासी विद्यार्थी अंजली पारधी मृत्यू प्रकरणी प्राथमिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या प्रकरणी अधिक चौकशी आम्ही करत आहोत.
– राजा वंजारी, पोलीस निरिक्षक, वासिंद पोलीस ठाणे 

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. गणेशोत्सवाची सुट्टी संपल्यानंतरही अंजली पारधी ही विद्यार्थीनी आश्रम शाळेत परत न आल्याने याबाबत शाळेचे मुख्याध्यापक, महिला अधिक्षिका तसेच शिक्षकांनी तिचे रास येथील घर गाठले. अंजलीबाबत चौकशी केली असता तिचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. दरम्यान ही घटना अंत्यत गंभीर असल्याने शाळेच्या मुख्यध्यापकांनी तात्काळ आदिवासी विद्यार्थीनीच्या मृत्युबाबत आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांना माहिती दिली. याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांनी आदिवासी विद्यार्थी आपत्कालीन मृत्यू चौकशी समितीला कळवले आहे. तसेच वासिंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या घटनेची सखोल चौकशी पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत. आदिवासी विद्यार्थीनीने गळफास का घेतला, तसेच तिचे परस्पर दफनविधी का केले गेले?, या प्रकाराची पोलीस सखोल चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या संशयास्पद मृत्युच्या घटनेमुळे  शहापूर तालुक्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

अंजली पारधी या विद्यार्थीनीच्या मृत्युची घटना दुर्दैवी असून ही घटना आश्रमशाळेत घडलेली नाही. तर या विद्यार्थीनीने तिच्या रास येथील राहत्या घरी गळफास घेतला आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत असून पोलिसांच्या चौकशीतच मृत्यू मागचे खरे कारण स्पष्ट होईल.
– अरुणकुमार जाधव, आदिवासी प्रकल्प अधिकारी, शहापूर 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -