घरमुंबईरेल्वेकडून प्रवाशांना गर्दी व्यवस्थापनाचे धडे

रेल्वेकडून प्रवाशांना गर्दी व्यवस्थापनाचे धडे

Subscribe

एल्फिन्स्टन पुलाचा घटनेमुळे जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने आता गर्दीचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी एल्फिन्स्टन, करीरोड आणि परेल स्थानकांत रेल्वे कर्मचाऱ्यांकडून लाऊड स्पिकरच्या माध्यमातून गर्दीच्या व्यवस्थापन धडे प्रवाशांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर भारतीय सैन्य दलाकडून एल्फिन्स्टन पुलाची बांधणी झाली. मात्र प्रवाशांकडून पुलाचा वापर होत नसल्याने आता चक्क रेल्वे कर्मचाऱ्यांना लाऊडस्पिकरच्या माध्यमातून या पुलाचा वापर करण्याची विनंती केली जात आहे.

सप्टेंबर 2017 मध्ये एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन 22 प्रवाशांचा मृत्यू आणि 35 जण जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ पादचारी पूलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन पुलासह, मध्य रेल्वेवरील करी रोड आणि आंबिवली स्थानकातील पुलाचं काम भारतीय सैन्य दलाकडून करुन घ्यायचा निर्णय स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या तीन पुलांपैकी एल्फिन्स्टन पुलाचे काम पूर्ण झाले असून तो पूल प्रवाशांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे. परंतु प्रवाशांकडून पुलाचा वापर होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर आता माईक घेऊन पुलाचा वापर करण्यासाठी घोषणा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पावसाळ्यात रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी होऊन कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी मध्य रेल्वेआणि पश्चिम रेल्वेकडून गर्दीचे व्यवस्थापन करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मध्य रेल्वेकडून बुधवारी चार स्थानकांत या संदर्भात रंगीत तालीम सुद्धा करण्यात आली. यासाठी मध्य रेल्वेने चार गर्दीच्या स्थानकांची निवड केली असून त्यात चिंचपोकळी, करी रोड, परळ, दादर या स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस, तिकीट तपासणीस, स्टेशन मास्तर इत्यादी कर्मचारी या व्यवस्थापनात सहभागी झाले होते. या पावसाळयात गर्दी व्यवस्थापनासाठी युद्ध स्तरावर पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून संपूर्णपणे प्रयत्न सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -