घरमुंबईटॅक्सीचालकाने केले २१० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास!

टॅक्सीचालकाने केले २१० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास!

Subscribe

टॅक्सीचालकाने तब्बल २१० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना वांद्र्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने चोरट्या टॅक्सीचालकाला अटक केली आहे.

टॅक्सीत राहिलेले दागिने, रोकड किंवा मूल्यवान वस्तू प्रवाशाला परत देण्याच्या अनेक घटना आपण ऐकलेल्या आहेत. अशा घटनांमध्ये टॅक्सीचालकाच्या चांगुलपणबद्दल त्यांचं कौतुक देखील होतं. जे योग्यच आहे. पण काही टॅक्सीचालक प्रामाणिक नसतात, हे देखील तितकंच खरं. वांद्रेमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. टॅक्सीमधून सोन्याचे दागिने घेऊन प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला त्याचा फटका बसला असून टॅक्सीचालकानेच त्याच्याकडचे तब्बल २१० ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी तातडीने तपास करून संबंधित भामट्या टॅक्सीचालकाला अटक करून त्याला कोर्टासमोर हजर केलं. कोर्टानं त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

कशी केली चोरी?

पवनकुमार शांतीलाल जैन हे व्यवसायाने कपड्याचे व्यापारी आहेत. सध्या ते गुजरातच्या सुरत शहरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ५ जुलैला ते वाशी येथे विवाहित बहिणीच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी मुंबईत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा होता. वांद्रे रेल्वे टर्मिनस येथून त्यांनी एक टॅक्सी वाशी येथे जाण्यासाठी घेतली होती. सायंकाळी पावणेसहा ते साडेसहाच्या सुमारास या टॅक्सीचालकाने वांद्रे येथील पश्चिम दुतग्रती महामार्गावरील कलानगर ब्रिजखाली हातचलाखीने त्यांच्या बॅगेतून सव्वाचार लाख रुपयांचे २१० ग्रॅम वजनाचे दागिने काढून घेतले. त्यानंतर टॅक्सी बंद झाल्याचे सांगून त्यांना दुसर्‍या टॅक्सीने वाशी येथे जाण्यास सांगितले. त्यामुळे पवनकुमार जैन हे दुसर्‍या टॅक्सीने वाशीला जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांना त्यांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. ही चोरी टॅक्सीचालकाने केल्याची खात्री होताच त्यांनी खैरवाडी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकाने वांद्रे रेल्वे टर्मिनस ते कलानगर ब्रिज जंक्शनदरम्यानच्या सीसीटीव्हीची पाहणी केली.

- Advertisement -

हेही वाचा – विश्वासू मोलकरणीने दिला धोका; दागिन्यांची केली चोरी

…आणि चोराने दिली गुन्ह्याची कबुली!

या फुटेजवरुन वांद्रे येथील बेहरामपाड्यात राहणार्‍या ४७ वर्षीय फिरोज खान या टॅक्सीचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ते दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने पोलिसांनी जप्त केले. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -