घरमुंबईमुंबईत लहान मुलांमधील टीबीचे प्रमाण वाढतेय

मुंबईत लहान मुलांमधील टीबीचे प्रमाण वाढतेय

Subscribe

शहरात क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे विविध सर्व्हेेक्षणातून समोर आले असले तरी मुंबईत 15 वर्षांखालील मुलांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. क्षयरोगाविरोधात राबवलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत सहा महिन्यात 603 बालकांना क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

शहरात क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे विविध सर्व्हेेक्षणातून समोर आले असले तरी मुंबईत 15 वर्षांखालील मुलांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. क्षयरोगाविरोधात राबवलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत सहा महिन्यात 603 बालकांना क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. बदलती जीवनशैली व फास्ट फूडमुळे लहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन त्यांना क्षयरोगाची लागण होत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

2017 सालापासून राज्य सरकारने राबवलेल्या ‘अ‍ॅक्टिव्ह केस फायडिंग’ मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन क्षयरोगाचे रुग्ण शोधण्यात येत आहेत. या मोहिमेमुळे राज्यात क्षयरोगाचे नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणार्‍या राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात येणार्‍या सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येते. या तपासणीत 15 वर्षांखालील बालकांचीही तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये राज्यात सहा महिन्यांत 15 वर्षांखालील दोन हजार 430 बालकांना क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळले आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक 603 तर ठाणे व पालघरमध्ये 440 क्षयरोगाने बाधित बालके आढळून आली आहेत. मुंबईमध्ये लहान मुलांमध्ये वाढलेले क्षयरोगाचे प्रमाण हे चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

बदलती जीवनशैली, फास्टफूडचे सेवन याचबरोबरच झोपडपट्टी व चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या इमारतींमुळे मुंबईत क्षयरोगाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना क्षयरोगाची बाधा होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यातूनच क्षयरोग बाधित नवे रुग्ण सापडत असल्याने रुग्णांमध्ये वाढ झाली असे म्हणता येणार नाही. तर क्षयरोग नियंत्रण मोहिमेमुळे ते उपचाराच्या कक्षेत आले आहेत. परिणामी क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या कार्यक्रमाला यश मिळत आहे.
– डॉ. संजीवकुमार कांबळे, संचालक, आरोग्य विभाग

सकस आहार खाण्याऐवजी लहान मुलांचा कल ब्रेड, जाम, फास्टफूड सारखे पदार्थ खाण्याकडे अधिक असतो. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे बालकांनी अंडी, दूध, पालेभाज्या खाल्ल्यास त्यांची रोगप्रतिक्रारक शक्ती वाढून त्यांना क्षयरोगाची लागण होणार नाही.
– डॉ. राजश्री कटके, बालरोगतज्ज्ञ व वैद्यकीय अधिक्षक, कामा हॉस्पिटल

बदलत्या जीवनशैलीचा व फास्टफूड खाण्यामुळे लहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. त्यामुळे त्यांना क्षयरोगाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यातच तपासणीसाठी आवश्यक असलेला कफ काढून देण्यास लहान मुले टाळाटाळ करत असल्याने त्यांना लागण झाल्याचे लक्षात येत नाही.
– डॉ. ललितकुमार आनंदे, वैद्यकीय अधिक्षक, शिवडी क्षयरोग हॉस्पिटल

क्षयरोग पसरण्याची कारणे
– क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराचे विषाणू हवेतून श्वसनाद्वारे पसरतात.
– घरातील प्रौढ व्यक्तीला क्षयरोग झाल्यास लहान मुलांनाही लागण होण्याची शक्यता अधिक
– कुपोषण, एचआयव्हीबाधित मुले, दाट लोकवस्ती यामुळे क्षयरोगाची लागण होण्याची शक्यता

- Advertisement -

क्षयरोगग्रस्तांना मिळणार 500 रुपये
क्षयरोगग्रस्तांना पोषण आहार मिळावा यासाठी केंद्र सरकारतर्फे दरमहा 500 रुपये देण्यात येतात. पण हे पैसे मिळवण्यासाठी रुग्णाचे बँक खाते असणे आवश्यक आहे. परंतु अनेक रुग्णांचे खाते नसल्याने त्यांना पैसे मिळण्यात होणारी अडचण लक्षात घेऊन सरकारने यापुढे रुग्णाच्या नातेवाईकाच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

मदतीसाठी टोल फ्री क्रमांकक्षयरोगग्रस्त रुग्णांना सरकारी मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारतर्फे 1800116666 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर खासगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे रुग्णांनी नोंद केल्यानंतर त्यांना मदत मिळते.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -