पेपर तपासणीच्या मानधनाच्या प्रतीक्षेत शिक्षक; दहावी निकालाच्या दोन महिन्यांनतर राज्य मंडळाचा विलंब

फोटो प्रातिनिधिक आहे
फोटो प्रातिनिधिक आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक शिक्षकांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ आहे. त्यातच आता राज्य मंडळाने दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे मानधन अद्याप शिक्षकांना न दिल्याने शिक्षकांची अवस्था बिकट झाली आहे. बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे अनेक शिक्षकांचे लक्ष मानधनाकडे लागून आहे. परंतु दहावीचा निकाल जुलैमध्ये घोषीत होऊनही अद्याप मानधन न मिळाल्याने शिक्षकांकडून मानधन कधी मिळेल अशी विचारणा होऊ लागली आहे.
राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचे निकाल २९ जुलैला जाहीर करण्यात आले. हे निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी राज्य मंडळाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत शिक्षकांकडून उत्तर पत्रिका तपासणीचे काम पूर्ण केले. हे काम करताना अनेकदा शिक्षकांनी आपल्या जीवाची काळजी न घेता कोरोना काळामध्ये शाळेमध्ये जाऊनही उत्तरपत्रिकांची तपासणी केली. लॉकडाऊनमध्ये बंद असलेली रेल्वे आणि सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असलेल्या एसटी व बसमध्ये शिक्षकांना परवानगी नाकारण्यात आल्याने त्यांना उत्तरपत्रिका शाळेतून घरी नेणे व त्या नियामकाकडे जमा करण्यासाठी तारेवरची कसतर करावी लागत होती. शिक्षकांना या कामासाठी दरवर्षी अवघा २०० रुपये प्रवास भत्ता दिला जातो. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका शाळेतून घरी नेणे व नियामकाकडे पोहचवण्यासाठी शिक्षकांना खासगी वाहन करावे लागल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. उत्तरपत्रिका पोहचवण्यासाठी शिक्षकांना एक हजारापेक्षाही अधिक खर्च आला. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांना अवघे १२०० ते १५०० रुपये मानधन मिळते. दहावीचा निकाल जाहीर होऊन दोन महिने उलटले तरी हे तुटपुंजे मानधन आणि प्रवास भत्ता देण्यासही राज्य मंडळाकडून विलंब करण्यात आला आहे. त्यामुळे मानधन व प्रवासभत्ता लवकरात लवकर देण्यात यावा, तसेच यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे यंदा झालेला जास्त खर्च लक्षात घेऊन बोर्डाने सहानुभूती पूर्वक न्याय करावा अशी मागणी टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यानी केली आहे.

परीक्षकांना नियमकांकडे ४ ते ५ वेळा जावे लागते. यासाठी फक्त २०० रुपये प्रवास भत्ता दिला जातो. तर उत्तरपत्रिका तपासणीसाठी १२०० ते १५०० रुपये दिले जातात. लॉकडाऊनमुळे हे पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने शिक्षकांचे हाल होत आहेत. ही रक्कम तातडीने देण्याबरोबरच यामध्ये वाढ करण्यात यावी.
–  राजेश पंड्या, उपाध्यक्ष, टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट