घरमुंबईतंत्रज्ञान हे शिक्षकांसमोर मोठे आव्हान

तंत्रज्ञान हे शिक्षकांसमोर मोठे आव्हान

Subscribe

लहान मुलांना तंत्रज्ञानाचे आकलन फार लवकर होते. याउलट अनेक शिक्षकांना अद्यापही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अडचणी येतात. त्यामुळे शिक्षणात तंत्रज्ञानाचा होणारा वाढता वापर हे शिक्षकांसाठी मोठे आव्हान असेल, असे मत विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले. तंत्रज्ञानाच्या वापरात विद्यार्थी फार पुढे असल्याने शिक्षकांना त्यांचे विचार बदलण्याची गरज असणार आहे, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.

मातृभाषेतून आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार करणारे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) व गुगलमार्फत नेहरू सेंटरमधील हॉल ऑफ कल्चरमध्ये भविष्यातील शिक्षणाचा वेध घेणारी परिषद घेण्यात आली. परिषदेत ‘भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील शिक्षण’ या विषयावर झालेल्या परिसंवादात अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव नंद कुमार सहभागी झाले होते. परिसंवादात एमआयईबीमध्ये भविष्यात राबवण्यात येणार्‍या शिक्षण पद्धतीबाबत उहापोह करण्यात आला. यावेळी भविष्यात शिक्षणात होणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर मते मांडताना सध्याच्या लहान मुलांना तंत्रज्ञानाचे आकलन फार जलद गतीने होत असल्याचे अनेक घटनांमधून आपल्याला पाहायला मिळते.

- Advertisement -

घरामध्ये कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणल्यावर तिचे कार्य मुलांना जलद गतीने समजते. इतकेच नव्हे तर एमआयईबीच्या विविध शाळांमध्ये वापरण्यात येणार्‍या तंत्रज्ञानाबाबत अजूनही काही शिक्षकांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. या उलट विद्यार्थ्यांनी तिचे ज्ञान लवकर आत्मसात केले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर असणार्‍या नव्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांचा अधिक कस लागणार आहे. इतकेच नव्हे तर तंत्रज्ञान हेच शिक्षकांसमोर मोठे आव्हान असेल असे मत नंद कुमार यांनी मांडले. त्याचप्रमाणे काकोडकर यांनी तंत्रज्ञानाचे फायदा विषद करताना गडचिरोलीमध्ये अभय बंग यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने कशाप्रकारे स्थानिकावर उपचार करून तेथील बालमृत्यूचे प्रमाण कमी केल्याचे सांगितले.

एमआयईबीच्या कोल्हापूरमधील वाबळेवाडी शाळेत विद्यार्थ्यांच्या केलेल्या सर्व्हेक्षणातून तंत्रज्ञानातून मिळणार्‍या शिक्षणामुळे सध्या त्यांना शिक्षकांची गरज नसल्याचे लक्षात आले. शाळेतील विद्यार्थी यूट्यूब, गुगलवरून माहिती मिळवतात. त्यातूनच वाबळेवाडीतील एका विद्यार्थ्यांनी रडार बनवल्याचे सांगत नंद कुमार यांनी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षकांनी त्यांचे विचार बदलावे गरजेचे असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांना माहिती मिळणार असली तरी त्यांना मार्गदर्शनाची गरज भासणार असून ती शिक्षकच पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. या परिषदेत भविष्यात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काय साधता येईल याचा आढावा घेण्यात आला. तसेच मातृभाषेतून शिक्षण घेताना ते परिपूर्ण कसे असेल याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मतही मांडण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केले, तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या भाषणाने समारोप झाला.

- Advertisement -

एमआयईबीमध्ये गुगलच्या तंत्रज्ञानाचा वापर
गुगलचे अत्याधुनिक तंत्रज्ञान एमआयईबीच्या शाळांमध्ये वापरण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक दर्जेदार होऊ शकेल. या बोर्डामध्ये शैक्षणिक अध्ययन पध्दती स्वतंत्र प्रकारची आहे. शिक्षक व मुख्याध्यापक हा एमआयईबीचा पाया आहे, एमआयईबीचा हा प्रयोग सशक्तपणे पुढे न्यायचा आहे, त्यादृष्टीने गुगलच्या सहकार्याने अशा स्वरुपाचा आधुनिक उपक्रम सुरु केला आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता अधिक विकसित होण्याच्या दृष्टीने नक्कीच होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

तीन महिन्यात पूर्ण करणार अभ्यासक्रम
सध्या विद्यार्थ्यांना आव्हाने दिल्यास ते जलद गतीने पूर्ण करतात. आम्ही वाबळेवाडीतील विद्यार्थ्यांना बालभारतीचे पुस्तक वाचून दुसर्‍या दिवसापार्यंत पूर्ण करण्यास सांगितले होते. विद्यार्थ्यांनी रात्री 12 वाजताच ते पुस्तक वाचून पूर्ण केले. विद्यार्थी फार जलद असल्याने आम्ही एमआयईबीचे वर्षभराचे शिक्षण तीन महिन्यात पूर्ण करणार आहोत, उर्वरित कालावधीत त्यांना भविष्य घडवण्याचे शिक्षण देण्यात येणार असल्याचे नंद कुमार यांनी सांगितले.

‘बोलो’ अ‍ॅपचे मार्गदर्शन
इंग्रजी व हिंदी भाषेचे वाचन करणे व समजण्यासाठी सोपे जावे यासाठी गुगलने बनवलेले ‘बोलो अ‍ॅप’ आता मराठीमध्ये आणण्यात येणार आहे. त्यामुळे मराठीमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे अ‍ॅप फायदेशीर ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -