घरमुंबई१ हजार गावांमध्ये १० हजार लिटरच्या टाक्या

१ हजार गावांमध्ये १० हजार लिटरच्या टाक्या

Subscribe

पाणीटंचाई असलेल्या भागात टँकरद्वारे पाणी पुरविताना नागरिकांना, विशेषतः महिलांना होणारा त्रास वाचावा आणि टँकरच्या पाण्याचे योग्य वितरण व्हावे, यासाठी राज्यातील दुष्काळी भागातील एक हजार गावांमध्ये दहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या प्लास्टिक टाक्या बसविण्याचे निर्देश शुक्रवारी नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पाटील यांनी ही माहिती दिली.

पाणीटंचाई असलेल्या 1,688 गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी टँकर सुरू आहेत. गावात टँकर आले की, पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. विशेषतः महिलांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन टँकर सुरू असलेल्या गावांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दहा हजार लिटर क्षमतेच्या एक हजार टाक्या बसविण्यात येणार आहेत. यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांसमवेत बोलणे झाले असून, काही कंपन्या यासाठी मदत करणार आहेत. दहा नळ जोडलेल्या या टाक्यांमध्ये टँकरचे पाणी भरून ठेवण्यात येईल. यामुळे पाणी घेण्यासाठी होणारी झुंबड व गडबड टळून सर्वांना व्यवस्थित पाणीपुरवठा होईल. राज्य शासनाने यापूर्वीच दुष्काळी भागासाठी निधी वितरित केला आहे. ही मदत शेतकर्‍यांना देण्याची कार्यवाही सुरू असून त्यावर रोजच्या रोज लक्ष ठेवले जात आहे.

- Advertisement -

दुष्काळी कालावधीत राज्यातील दुष्काळी भागातील जनावरांसाठी 144.42 लाख मेट्रिक टन वाळलेल्या चार्‍याची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी योजनेच्या वैरण विकास कार्यक्रमांतर्गत 9.62 लाख मेट्रिक टन हिरव्या वैरणीचे उत्पादन करण्यात येत आहे, तसेच 85 हजार 338 हेक्टर गाळपेर क्षेत्रात वैरण उत्पादनासाठी 19 हजार 878 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यांना आतापर्यंत 14 हजार 906 क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. आतापर्यंत पेरणी झालेल्या 18 हजार 450 हेक्टर गाळपेर जमिनीतून 14.33 लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -