घरमुंबईपालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडला

पालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडला

Subscribe

राज्य सरकारने सरकारी नोकरीची तब्बल 71 हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला असताना मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग रिक्त असलेली 10 हजारहून अधिक पदे भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकारने सरकारी नोकरीची तब्बल 71 हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला असताना मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग रिक्त असलेली 10 हजारहून अधिक पदे भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. मुंबईकरांच्या आरोग्याबाबत महापालिका किती बेफिकीर आहे, हे यावरून दिसून येत आहे.

मुंबई महापालिका दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये तीन हजार कोटींपेक्षा अधिक तरतूद आरोग्य सेवेसाठी करते. मात्र नागरिकांना व्यवस्थित आरोग्य सेवा मिळावी यासाठी आवश्यक असलेले डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी वर्ग भरण्याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये 1085, शीव हॉस्पिटलमध्ये 920 तर नायर हॉस्पिटलमध्ये 794 रिक्त पदे आहेत. त्याचबरोबर पालिकेचे आरोग्य केंद्र, प्राथमिक उपचार केंद्र यासारख्या विविध आस्थापनांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असल्याने हॉस्पिटलसह पालिकेच्या विविध आरोग्य केंद्र, प्राथमिक उपचार केंद्रांमध्ये रुग्णांच्या रांगा लागत आहेत.

- Advertisement -

लॅब टेक्निशियन्स, एक्स-रे टेक्निशियन्स नसल्यामुळे रुग्णांना विविध चाचण्या करण्यासाठी खासगी लॅबकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे त्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. परिचारिका व वॉर्डबॉय यांची पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. एक्स-रे, रक्त तपासणी, सीटी स्कॅन इत्यादी चाचण्या करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर किंवा व्हिलचेअर घेऊन स्वत: जावे लागते. आरोग्य केंद्रांमध्ये फार्मासिस्ट नसल्याने रुग्णांना चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांमार्फत औषधे दिली जातात. यामुळे रुग्णांना चुकीची औषधे दिली जाऊन त्यांच्या जीविताला हानी पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची टाळाटाळ करून पालिका रुग्णांच्या जीवाशी खेळ करत आहे.

पालिका आरोग्य विभाग
१९४ संवर्गातील २९,१34 मंजूर पदे असून, 10,015 पदे रिक्त

महत्त्वाची रिक्त असलेली पदे

प्रोफेसर ११०
असोसिएट प्रोफेसर १७०
असिस्टंट प्रोफेसर ३०६
मेडिकल ऑफिसर ९९
असिस्टंट मेडिकल ऑफिसर ९३
रजिस्ट्रार १६४
हाऊस ऑफिसर २३३
हॉननरी ११८
स्पेशिलिटी मेडिकल कन्सलटंन्ट १३१
क्लार्क ३८९
सीसीटी ९०
लॅब टेक्निशियन १२७
एक्स-रे असिस्टंट ११२
लॅब असिस्टंट १५२
फार्मासिस्ट ६४
परिचारिका २४३
‘वॉर्ड अटेंडन्ट’(बॉय) ५२०
स्विपर ४५८
लेबरर १२७
हमाल १२८
आया १४६
ड्रेसर १०८
लिफ्ट / वायर / पंप मॅन ८५
लिफ्टमॅन ५०


पालिकेच्या विविध विभागांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासांदर्भात आम्ही प्रशासनाला प्रस्ताव पाठवला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
– डॉ. पद्मजा केसकर,
कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका


महापालिकेच्या आरोग्य विभागात असलेली रिक्त पदे का भरली जात नाहीत, असा प्रश्न आम्हालाही पडलेला आहे. रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य समितीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करू आणि रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनावर दबाव आणू.
– बिंदू त्रिवेदी,
नगरसेविका व सदस्य, आरोग्य समिती.


रुग्णाचा जीव जाऊ शकतो
पालिकेकडून डॉक्टर, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ, परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची भरती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालये, दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांचे हाल होतात. आरोग्य केंद्रांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांकडून औषधे दिली जातात. चुकीची औषधे दिल्यास एखाद्या रुग्णाचा जीव जाऊ शकतो.
– दीपक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, सम्यक फाऊंडेशन व दक्ष मुंबईकर समिती.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -