घरमुंबईदहा वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेल्या तरुणाचा शोध रेल्वे पोलिसांमुळे लागला

दहा वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेल्या तरुणाचा शोध रेल्वे पोलिसांमुळे लागला

Subscribe

रेल्वे अपघातात जखमी झाला; ‘टोंग’ शब्दावरुन पालकांपर्यंत पोहचले पोलीस

दहा वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेल्या एका तरुणाचा शोध वांद्रे रेल्वे पोलिसांमुळे लागला. हा तरुण रेल्वे अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. ‘टोंग’ या शब्दावरुन त्याच्या पालकांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले. दहा वर्षांनंतर हा तरुण सापडल्याने त्यांच्या नातेवाइकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आसिफ नसीम मोहम्मद शेख असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा राजस्थानच्या बनेर बहिरबुट्टी परिसरातील रहिवाशी आहे. बेरोजगारीला कंटाळून तो नोकरीसाठी मुंबई शहरात पळून आला होता. दहा वर्षांपूर्वी तो कोणालाही काहीच न सांगता मुंबईत आल्याने त्याच्या पालकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याची मिसिंग तक्रार बनेरमधील स्थानिक पोलीस ठाण्यात केली होती, मात्र बराच शोध घेतल्यानंतर आसिफ हा पोलिसांना सापडला नाही, त्यामुळे ही केस जवळपास बंदच झाली होती.

- Advertisement -

लोकलची धडक
रविवारी 25 नोव्हेंबरला आसिफ हा एका उपनगरीय लोकलची धडक लागून जखमी झाला होता. त्यामुळे त्याला वांद्रे रेल्वे पोलिसांनी उपचारार्थ केईएम रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. यावेळी रेल्वे पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली होती. या चौकशीत तो राजस्थानच्या ‘टोंग’ या गावचा रहिवाशी असल्याचे सांगितले. ‘टोंग’ या शब्दावरुन त्याच्या पालकांचा वांद्रे रेल्वे पोलिसांनी शोध सुरु केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांच्या पथकातील ए. एस. सय्यद आणि संदीप नाळे यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधून जखमी तरुणाविषयी माहिती दिली. तसेच त्याचा फोटोही पाठविला होता.

पोलिसांनी केली आर्थिक मदत
या फोटोवरुन आसिफला त्याच्या एका नातेवाइकांनी ओळखले, मात्र गरिबीमुळे त्यांना मुंबईत जाणे शक्य होत नव्हते. अखेर स्थानिकांनी केलेल्या आर्थिक मदतीनंतर त्याचे नातेवाईक मुंबईत आले. या नातेवाइकांनी वांद्रे रेल्वे पोलिसांची भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली. त्यानंतर आसिफला त्याच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. बेरोजगारीला कंटाळून आसिफ हा दहा वर्षांपूर्वी घर सोडून गेला होता. या दहा वर्षांत त्याने घरच्या लोकांशी कधीच संपर्क साधला नाही, मात्र रेल्वे अपघातानंतर रेल्वे पोलिसांनी केलेल्या प्रयत्नामुळेच त्याची नातेवाइकांशी भेट होऊ शकली. गावी जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते; पण रेल्वे पोलिसांनी त्यांना मदत केल्याने त्यांना त्यांच्या गावी जाता आले असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -