घरमुंबईकसारा पोलिसांवर अपुर्‍या मनुष्यबळामुळे ताण

कसारा पोलिसांवर अपुर्‍या मनुष्यबळामुळे ताण

Subscribe

ठाणे ग्रामीण अंतर्गत येणार्‍या कसारा पोलीस ठाण्यात अपुर्‍या मनुष्य बळामुळे कार्यरत कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित लहान मोठी गुन्हेगारी, राष्ट्रीय महामार्गावर लहानसहान व गंभीर स्वरूपाचे घडणारे अपघात, तसेच चोर्‍या लुटमारीचे प्रकार देखील या महामार्गावर घडत असल्याने पोलिसांना रात्रीच्यावेळी गस्तीसाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. यासर्व वाढत्या कामाच्या ताणाचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होत आहे.

सन 1991 पोलीस कसारा पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या पोलीस ठाण्यास 42 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली. मात्र सद्यस्थितीत वाढती लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी पाहता कर्मचारी संख्या पूर्ण करण्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना यश आलेले नाही. सध्या कसारा पोलीस ठाण्यात 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 उपनिरीक्षक आणि 39 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातही इतर कामांचा भार पडत असल्याने कमी संख्याबळ कार्यरत असल्याचे पाहायला मिळते. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राचा व्याप मोठा असल्याने हे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 गावे 92 पाडे मिळून एक लाखाच्या घरात असलेली लोकसंख्या, 14 किलोमीटर लांबीचा मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग, प्रसिद्ध असलेला कसारा घाट, मध्य वैतरणा धरण तसेच अशोका पर्यटन स्थळ आणि सातत्याने वाढणारा कसारा गाव तसेच आसपासचा परिसर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ 20 ते 25 कर्मचारी काम करत असल्याने कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. तसेच अपघातातील तपास, दैनंदिन घडणारे गुन्हे यामुळे ग्रामीण भागातील गाव पाड्यांकडे पोलिसांना लक्ष देणे अशक्य होते. या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना अपुर्‍या मनुष्यबळामुळे अवघड जात आहे.

- Advertisement -

या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात खून, दरोडे, बेवारस मृतदेह, चोर्‍या, घरगुती भांडणे,अपघात असे अनेक गुन्हे घडत असल्याने कसारा पोलीस ठाणे एक संवेदनशील पोलीस ठाणे झाले आहे. यामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या तपासाचा ताण देखील कर्मचार्‍यांवर येतो आहे. याचा विचार करुन पोलीस अधीक्षकांनी लवकरात लवकर कसारा पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ वाढविण्याची मागणी नागरिक करत आहेत.

खर तर सद्यस्थितीत नेमणुकीत असलेल्या कर्मचार्‍यांपैकी 20 ते 25 कर्मचारी कामासाठी उपलब्ध होत आहेत. त्यातही काही कर्मचारी कोर्टाच्या व इतर कामांसाठी नियमित बाहेर असतात. शिवाय आता निवडणुकीचा काळ असल्याने आणखीच कामाचा ताण वाढणार आहे.
-डी.पी.भोये,प्रभारी पोलीस निरीक्षक, कसारा(ठाणे ग्रामीण)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -