घरमुंबईभाजपचा डाव ठाण्यात मोठा भाऊ होण्याचा

भाजपचा डाव ठाण्यात मोठा भाऊ होण्याचा

Subscribe

राज्याच्या राजकारणात ठाणे हा महत्वाचा जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. तीन लोकसभा मतदार संघ आणि १८ विधानसभा मतदार संघ जिल्ह्यात येतात. एकेकाळी भाजपकडे असलेला लोकसभा मतदार संघ सेनेने हिसकावून घेतला आहे. मागील निवडणुकीत ठाण्यात सेनेच्या गडाला भाजपनेच सुरुंग लावला होता. आता नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या गडाला भाजपने खिंडार पाडले आहे. त्यामुळे ठाण्यात मोठा भाऊ बनण्याची भाजपची रणनीती यशस्वी ठरत आहे.
रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांची परंपरा लाभलेला ठाणे लोकसभा मतदार संघ १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सेनेने युतीत भाजपकडून हिसकावून घेतला. त्याची सल भाजपच्या मनात कायमच आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघात सेनेचे खासदार आहेत. तर भिवंडीत भाजपचा खासदार निवडून आला आहे. ठाणे लोकसभा मतदार संघात मिरा भाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी-पांचपाखाडी, ठाणे, ऐरोली, बेलापूर हेे सहा विधानसभा मतदार संघ येतात.

ठाणे मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जायचा. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मागील निवडणुकीत भाजपने सेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. स्वतंत्रपणे लढलेल्या निवडणुकीत ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात भाजपचा आमदार निवडून आला. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदिला भाजपने सुरुंग लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते गणेश नाईक यांनाच गळाला लावले आहे. गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश झाला. ठाणे जिल्ह्यात आगरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. नाईकांच्या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. तसेच मीरा-भाईंदरमधील मारवाडी, गुजराती आणि जैन समाजाचे प्राबल्य असल्याने या भागात भाजपचे वर्चस्व आहे. सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. आता राष्ट्रवादीचे संदीप नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाण्यात सेनेपेक्षा भाजप वरचढ झाली आहे. सेनेपेक्षा भाजपची एक जागा वाढली आहे.

- Advertisement -

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे जितेंद्र आव्हाड हे एकमेव आक्रमक नेते आहेत. काँग्रेसकडे तसा आक्रमक नेता नाही. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था दयनीय आहे, असेच म्हणावे लागेल. मनसेने लोकसभा निवडणूक लढविली नव्हती, त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविणार की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र मनसेची लाखभर मते आहेत. लोकसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेल्या वंचित आघाडीने चांगली मते मिळवली. परंतू विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बरोबर मोट बांधणार का ? याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या तरी सेना-भाजपला टक्कर देईल इतका विरोधी पक्ष सक्षम नाही. पण ठाण्यात सेनेपेक्षा भाजप वरचढ होऊ लागलाय हे निश्चित.

ठाणे जिल्ह्यातील आमदार
मिरा भाईंदर – नरेंद्र मेहता (भाजप), ओवळा माजिवडा- प्रताप सरनाईक (शिवसेना), कोपरी-पांचपाखाडी – एकनाथ शिंदे (शिवसेना), ठाणे शहर – संजय केळकर ( भाजप ), ऐरोली – संदीप नाईक (सध्या भाजपमध्ये), बेलापूर – मंदा म्हात्रे (भाजप )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -