घरमुंबईठाणे, कल्याण आणि वसईकरांचा प्रवास लवकरच जलवाहतुकीतून !

ठाणे, कल्याण आणि वसईकरांचा प्रवास लवकरच जलवाहतुकीतून !

Subscribe

ठाणे महापालिकेच्या आराखड्याला केंद्राची मंजुरी

ठाणे, कल्याण, वसई या जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांच्या जेट्टीच्या कामांना सुरुवात होत आहे. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या डीपीआरला केंद्र शासनाने मंजुरी दिली असून, महापालिकेच्या सल्ल्याने जेएनपीटी या जेट्टींचे बांधकाम करणार आहे. ठाणे, कल्याण, वसई या जलमार्गासाठी ६४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार असून त्यापैकी १०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता जेएनपीटीकडे वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. दिवाळीत ठाणे, कल्याण आणि वसईकरांसाठी ही मोठी खुशखबर मिळाली आहे. हे वृत्त सर्वप्रथम ‘आपलं महानगर’ने ३१ जुलै २०१८ रोजी ‘जलमार्ग लवकरच सुरू ! ठाणे महापालिकेचा आराखडा केंद्राकडे सादर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.

ठाणे आणि त्यापुढील प्रवाशांना वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने कल्याण, ठाणे, मुंबई या जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला होता. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन या संपूर्ण प्रकल्पाचा डीपीआर तयार करून त्याचे सादरीकरण केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केले होते. कल्याण, ठाणे, वसई आणि कल्याण, ठाणे, मुंबई अशा दोन टप्प्यांत हा प्रकल्प होणार असून, पहिल्या टप्प्यात कल्याण, ठाणे, वसई हा ६४५ कोटी रुपयांचा जलमार्ग विकसित करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

इथे उभारणार जेट्टी

केंद्र सरकारच्या अखत्यारितील जेएनपीटी ठाणे महापालिकेच्या सल्ल्याने हे काम करणार आहे. या प्रकल्पांतर्गत १०० कोटींचा निधी जेएनपीटीकडे वर्ग करण्यात येत असून त्याअंतर्गत डोंबिवली, काल्हेर, कोलशेत आणि मीरा रोड येथे चार जेट्टींच्या बांधकामाला सुरुवात होत आहे, असे खा. शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे ठाणे आणि त्यापुढील प्रवाशांना रेल्वे व्यतिरिक्त वाहतुकीचा सक्षम आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध होणार आहे.

असा होता अहवाल

वाढत्या वाहतूक समस्येला पर्याय म्हणून स्वस्त आणि पर्यावरण पूरक जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ठाणे शहरातील अंतर्गत जलवाहतुकीचा प्रकल्प ठाणे महापालिकेने केंद्रीय मंत्रालयाकडे सादर केला होता. मात्र मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसई या शहरांना विस्तीर्ण खाडी आणि समुद्र किनारा लाभला असल्याने केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने एमएमआरडीए क्षेत्रातील जलवाहतूक प्रकल्पाची चाचपणी करून त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेवर सोपवली होती. ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने सल्लागार नेमून हा प्रकल्प अहवाल केंद्राकडे सादर केला होता. या प्रकल्पासाठी १९ जेट्टी बांधावी लागणार आहे. तसेच ५० बोटींची आवश्यकता भासणार असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले होते.

- Advertisement -

असा असेल मार्ग 

वसई, मीरा, भाईंदर, घोडबंदर, नागला, काल्हेर, अंजूर, दिवे, पारसिक, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याण या भागातून ही जलवाहतूक जाणार आहे. या ठिकाणी जेटी बांधल्या जाणार आहेत. जलवाहतुकीमुळे रस्ते रहदारीवरचा सुमारे २० टक्केे भार हलका होणार आहे. तर जलमार्गाचा वापर केल्याने ३३ टक्के इंधन बचत आणि ४२ टक्के प्रदूषणास आळा बसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -