घरताज्या घडामोडीCyclone Nisarga: चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी ठाणे, केडीएमसीची आपत्कालीन यंत्रणा सज्ज

Cyclone Nisarga: चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी ठाणे, केडीएमसीची आपत्कालीन यंत्रणा सज्ज

Subscribe

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर दिनांक ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आणि केडीएमसीची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ३ जून २०२० रोजी पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीमध्ये वेगवान वारे वाहण्याची शक्यता असून जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून ठाणे महानगरपालिकेचा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि विभागवार प्रभाग समिती नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सज्ज ठेवण्यात आले आहेत. ठाणे अग्निशमन दल यांच्यासह राज्य आपत्ती निवारण दल(एसडीआरएफ) आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ)चे पथक सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाकडून तातडीने हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीअंतर्गत संभाव्य धोका पोहोचू शकणाऱ्या वसाहती तसेच सखल भागातील वसाहती निश्चित करून तेथील नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. मच्छीमार आणि इतरांनी देखील खाडीकिनारपट्टीवर जाऊ नये, खाडी किनाऱ्यापासून लांब रहावे, झाड आणि खांब यांच्याखाली नागरिकांनी उभे राहू नये, वादळाच्या कालावधीमध्ये घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

अफवांवर विश्वास ठेवू नका

ठाणे शहरातील मोठ्या औद्योगिक आस्थापना आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांनी आपली यंत्रणा आणि सामुग्री सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. ठाण्यातील सर्व रुग्णालयांनी वीज जनित्र (जनरेटर) कार्यान्वित आहेत, याची दक्षता घेऊन वीजपुरवठा अखंड सुरू राहील, याची तजवीज करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, आवश्यक साधने जवळ बाळगावीत आणि वैयक्तिक स्तरावर देखील खबरदारी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

हॉस्पिटल्सना जनरेटर बॅकअप ठेवण्याच्या सूचना

कल्याण डोंबिवली शहरांना मोठा खाडीकिनारा लाभला असून खाडीकिनारी असलेल्या वस्त्या, घरे यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच केडीएमसी हद्दीतील सर्व कोविड आणि जनरल हॉस्पिटल्सना जनरेटर बॅकअप ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय काही नागरिकांचे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने स्थलांतर करावे लागले, तर त्यासाठी केडीएमटीच्या बसेस सज्ज ठेवण्यात आल्या असून ट्रान्झिट कॅम्पही तयार ठेवण्यात आले असल्याची माहिती केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -