गड राखण्यासाठी अटीतटीचा सामना

Mumbai
Thane
ठाणे लोकसभा मतदार संघ

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात 3 लोकसभा मतदारसंघ आणि 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये ठाणे लोकसभा मतदार संघ अग्रणी आहे. ज्यामध्ये मीरा भाईंदर, ओवळा-माजीवडा कोपरी-पाचपाखाडी, मुख्य ठाणे शहर, बेलापूर, ऐरोली या सहा विधानसभा मतदारसंघांचा अंतर्भाव होते. या मतदारसंघातील ठाणे सिटी सध्या स्मार्ट होण्याच्या दिशेने सरकते आहे. त्यामुळे या मतदारसंघाला अधिक महत्त्व आहे. क्लस्टर, मेट्रो, बुलेट ट्रेन, जलमार्ग, नवीन रेल्वे स्टेशन, ठाणे अंतर्गत मेट्रा आदी अनेक महत्त्वाचे प्रकल्प या मतदारसंघात कार्यान्वित होत आहेत तर काही होणार आहेत. त्याकरिता सेना-भाजप युतीच नव्हे तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह मनसे आणि इतर पक्ष देखील एकमेकांच्या मदतीने हा मतदारसंघ आपल्याकडे कसा राहिल याकरिता आग्रही आहेत. त्यामुळे शिवसेनेला यावेळेस आपला गड शाबूत ठेवण्यासाठी अटीतटीचा सामना करावा लागणार आहे.

जनता दलानंतर या मतदार संघावर काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसच्या शांताराम घोलप यांना पराभूत करून भाजपने सलग दोन पर्व हा मतदार संघ आपल्याकडे ठेवला. 1989 ते 96 पर्यंत भाजपच्या राम कापसे यांच्याकडे हा मतदार संघ होता. त्यानंतर सेना-भाजप युतीच्या राजकारणात हा मतदारसंघ शिवसेनेने घेतला आणि प्रकाश परांजपे सलग 12 वर्षे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर आनंद परांजपे हे पोटनिवडणुकीत विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचा पराभव केला. 2009 सालच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काबीज केला. संजीव नाईक यांनी शिवसेनेच्या विजय चौगुले यांचा पराभव केला. पुन्हा 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये शिवसेनेचे राजन विचारे निवडून आले.

आतापर्यंतचे बलाबल पाहता युतीच्या जोरावरच या मतदारसंघात शिवसेना विजयी होत आहे.अन्यथा मतांची विभागणी होऊन या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो. गावठाण आणि कोळीवाड्यांची जागा सिमेंटच्या टॉवरने घेतल्याने इथला भूमिपूत्र विस्थापित झाला आहे. अनेकांच्या जमिनी मोठ मोठ्या प्रकल्पासाठी बाधित झाल्या असताना लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान खासदार राजन विचारे यांनी याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिक गावकरी करीत आहेत. तसेच मिरा-भाईंदर, ओवळा माजीवडा परिसरात रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या स्थानिकांचा रोषही यावेळी शिवसेना-भाजपवर आहे. याचा फायदा इतर उमेदवारांना होऊ शकतो.त्यातच भाजपाच्या अनेक नगरसेवकांनी विचारे यांच्याविरोधात बंडाचे निशाण उभारले आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांत त्यांनी केलेली कामे आणि त्यांचा जनसंपर्क यावरच पुढील गणित अवलंबून आहे. कारण त्याच्या बरोबरीने राष्ट्रवादीसुद्धा तेवढ्याच ताकदीने उभी आहे.

Thane
ठाणे लोकसभा मतदार संघ

ठाणे महानगर पालिकेत दुसर्‍या क्रमांकावर राष्ट्रवादी आहे. शिवसेनेचे 67 तर राष्ट्रवादीचे 34 नगरसेवक ठाण्यात आहेत. तसेच राजन विचारे यांच्या आधी राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांनीही ठाण्यात आपला जनसंपर्क दांडगा ठेवला होता. त्यामुळेच मोदीची लाट असतानाही ठाण्यातून सेना-भाजप युती सोबत राष्ट्रवादीने बरोबरीची टक्कर दिली होती. मात्र ओवळा माजीवडा, मिरा-भाईंदर या पट्ट्यातील बहुतांश गुजराती समाजाने भाजपाच्या पारड्यात आपली मते टाकल्यानेच राजन विचारे विजयी झाले होते. अंतर्गत हेवेदाव्यांचे राजकारण न करता निवडणुकीचे राजकारण करून हा मतदारसंघ पुन्हा एकदा काबीज करावा याकरिताच संघर्ष सभा घेऊन राष्ट्रवादीने प्रचाराचा नारळ फोडला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छूक असून त्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होताच हा मतदार संघातून आपला उमेदवार उभा करण्याची तयारी मनसे करीत आहे. 2009च्या निवडणुकीत राजन राजे यांनीही मनसेच्या माध्यमातून भरघोस मते मिळवली होती. मात्र ओहोटीच्या काळामुळे मनसे बॅकफूटवर गेली आहे. जर राष्ट्रवादीने सोबत केली तर अनपेक्षित बदल घडू शकतो.एकंदरीत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे गणित यावेळेस कोणीही ठामपणे मांडू शकत नाही. कोणता पक्ष कोणासोबत राहून काय करेल? की संधीसाधूचे राजकारण घडेल हे येणार्‍या निवडणुकीतच समजेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here