घरमुंबईठाण्यात मोबाईल कंपन्यांची बनवाबनवी; ६५१ बेकायदा टॉवरची उभारणी

ठाण्यात मोबाईल कंपन्यांची बनवाबनवी; ६५१ बेकायदा टॉवरची उभारणी

Subscribe

ठाण्यात मोबाईल कंपन्यांनी हैदोस घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाण्यात मोठ्या संख्येने मोबाईल टॉवर उभारण्यात आले असून याची ठाणे महापालिकेकडे माहिती नसल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे शहरात सध्या मोबाईल टॉवरचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठाणे स्टेशन परिसरासह छोट्या – छोट्या इमारतीवर मोबाईल टॉवर उभे करण्यात आले आहेत. सुमारे एक हजार टॉवर ठाणे महापालिका क्षेत्रात असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध आहे. तर करविभागाने केलेल्या एका सर्व्हेक्षणानंतर ६५१ बेकायदा टॉवर ठाणे शहरात असल्याची माहिती समोर आली असून प्रशासनाकडे याचा सविस्तर तपशील नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठाणे हद्दीत दिवसेंदिवस टॉवरच्या संख्येत वाढ

दूरसंचार सुविधांच्या जाळ्यासाठी आणि बस स्थानक उभारणीसाठी सर्वसमावेशक नियमावली राज्य सरकारने ४ मार्च, २०१४ रोजी मंजूर केली आहे. मोबाइल टॉवर उभारणाऱ्या कंपनीने अर्ज केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४४ ते ४७ नुसार मंजुरी देणे बंधनकारक आहे. या कलमानुसार कोणत्याही बेकायदा, ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींवर मोबाइल टॉवर उभारणीला परवानगी देता येत नाही.

- Advertisement -

तसेच स्टॅण्डिंग अॅडव्हायजरी कमिटी फॉर फ्रीक्वेन्सी अलोकेशन (एसएसीएफए), वायरलेस प्लॅनिंग कमिशनची परवानगी, टेलिकॉम एन्फोर्समेंट रीसोर्स अॅण्ड मॉनेटरिंग सेलचा (टीईआरएम) रेडिएशन नियंत्रणात असल्याचा अहवाल, नागरी हवाई उड्डाण मंत्रालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, फायर ब्रिगेड यांच्यासह राज्य सरकारच्या संबंधित विभागांच्या परवानग्यासुध्दा बंधनकारक करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय टॉवर्सची संख्या, त्यांचे अंतर, सुरक्षेच्या उपाययोजना याबाबतची नियमावलीसुध्दा कठोर आहे. मात्र याचे कोणत्याही प्रकारे पालन होत नसल्यामुळे ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत दिवसेंदिवस टॉवरच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

धोकायदायक इमारतींवर उभारले टॉवर

ठाण्यात माजीवडा, उथळसर, वर्तकनगर, नौपाडा, रायलादेवी, वागळे इस्टेट, कोपरी, कळवा, मुंब्रा या ठिकाणी गृहनिर्माण सोसायट्यांच्या गच्चीवर या टॉवरची अनधिकृत्या उभारणी करण्यात आली आहे. यापैकी माजीवडा परिसरात याची संख्या जास्त आहे. तर मुंब्रा परिसरामध्ये अनधिकृत इमारतींवरच नव्हे तर धोकायदायक इमारतींवर हे टॉवर उभारण्यात आले आहेत. याशिवाय कोणत्याही परवानगी विना सध्या उद्यानातूनच टॉवर उभे करण्यास खाजगी कंपन्यांनी सुरुवात केली आहे. तर ठाण्यातील कासारवडवली येथील जैवविविधता उद्यानामध्ये उभारण्यात येणाऱ्या मोबाईल टॉवरचे काम स्थानिक रहिवाशांनी वेळीच आक्रमक भूमिका घेऊन बंद पाडले.

- Advertisement -

उद्यानात मोबाईल टॉवर उभारले

तसेच कोपरीच्या उद्यानामध्ये देखील अशाच प्रकारे मोबाईल टॉवर उभारण्याच्या कामासही सुरुवात झाली होती. त्याठिकाणी देखील स्थानिकांनी एकत्र येऊन येथे आंदोलन करून काम बंद केले. खेळायच्या उद्यानात टॉवर उभारण्यास या कंपन्यांना कोणी परवानगी दिली असा सवाल करीत यापुढे काम सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. त्यामुळे तुर्तास ही कामे बंद करण्यात आली आहेत. मात्र या कंपन्या रहिवाश्यांना न जुमानता स्थानिक कार्यकर्त्यांशी अर्थपूर्ण व्यवहार करून हे टॉवर उभे करत आहेत. यावर प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन या टॉवर्स कंपन्यांना नागरी परिसरातून हद्दपार करावे अशी आक्रमक भूमिका ठाणेकरांनी घेतली आहे.

शहरात कोणत्या-कोणत्या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत याचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयापासून हे मोबाईल टॉवर किती अंतरावर लावण्यात आले आहेत याची माहिती या सर्वेक्षणाच्या माध्यमातून समजणार आहे. हे टॉवर नियमाप्रमाणे लावण्यात आले आहेत कि नाहीत याची तपासणीही केली जाणार आहे. – अशोक बुरपुल्ले, उप आयुक्त, ठाणे महानगर पालिका

मोबाईल टॉवरचा योग्य पद्धतीने सर्वे करण्याची आवश्यकता आहे. शहरात आणखी नवीन टॉवर येण्याआधी हा सर्वे होणे आवश्यक आहे. – मिलिंद पाटील, विरोधी पक्षनेते ठामपा

मोबाइल टॉवरच्या रेडीएशनचे दुष्परिणाम टाळण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या नियमावलीनुसार कारवाई करण्यास सुरुवात केल्याचा दावा ठाणे पालिकेचे अधिकारी करत असले तरी काटेकोर कारवाई झाली, तर शहरातील सर्व टॉवर हद्दपार करावे लागतील अशी परिस्थिती आहे. कारण आजच्या घडीला शहरातील ६५१ पैकी एकही टॉवर अधिकृत परवानगीने उभारलेले नाही.  – राजीव दत्ता, सामाजिक कार्यकर्ते


वाचा – उल्हासनगरमध्ये मोबाईल टॉवर होणार अधिकृत; महापालिकेची परवानगी

वाचा – मोबाईल टॉवर्सची ६०० कोटी रुपयांची थकबाकी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -