घरमुंबईठाणे मनपाच्या आडमुठेपणामुळे कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात

ठाणे मनपाच्या आडमुठेपणामुळे कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात

Subscribe

पगार काढणार्‍या कंपनीकडून काम बंद, पालिकेने कंपनीचे थकविले 2.12 कोटी महापौर-आयुक्त चिंतेत, कंपनीची 1 कोटी अनामत रक्कम जप्त

ठाणे महापालिकेचा सर्व विभागांचा डाटा, कर्मचार्‍यांची माहिती, पे रोल आणि ई-गव्हर्नन्सचे काम सांभाळणार्‍या कंत्राटदार कंपनीची सव्वा महिन्यांपासूनची थकबाकी ठाणे महापालिकेने दिली नाही. त्यामुळे कंपनीने दोन आठवड्यांपूर्वी काम बंद करण्याची सूचना दिली होती. मात्र ठाणे महापालिकेचे आडमुठे धोरण आणि कंपनीला गृहीत धरल्यामुळे आर्यंश इंडस्ट्रीज आणि ठाणे मनपा कर्मचारी-अधिकार्‍यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. कारण पगार काढणार्‍या कंपनीची दोन वर्षांपासून बिले थकवल्याने कंपनीने दोन आठवड्यांपूर्वी नोटीस देत काम थांबवले. ऐन दिवाळीतच कर्मचार्‍यांचे पगार वेळेत न झाल्याने महापालिकेचे सात हजार कर्मचारी, अधिकारी चिंतेत आहेत. एकूण बजेटच्या 0.06 टक्के असणारी रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केल्याने अखेर कंत्राटी कंपनीने इंगा दाखवल्याने प्रशासन हादरले आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्यात पहिल्या 10 महापालिकांत नोंद होणार्‍या ठाणे महापालिकेचे बजेट 3695 कोटी आहे. त्यापैकी वर्षाला कर्मचार्‍यांवर 350 कोटी खर्च करते. मात्र मागील सव्वा वर्षांपासून ठाणे मनपासाठी काम करणार्‍या कंपनीने 2 कोटी 12 लाख रुपये थकवल्याने महापालिकेची नाचक्की झाली आहे.

- Advertisement -

ठाणे महापालिका हायटेक करताना ऑक्टोबर 2015 मध्ये ई-गव्हर्नन्ससाठी निविदा मागवल्या. या निविदेत एकूण दोन फेजमध्ये काम करण्यासाठी सर्वात कमी किंमत निविदेत भरलेल्या आर्यंश इंडस्ट्रीज कंपनीला काम मिळाले. पाच वर्षांसाठी सुमारे 11 कोटीला मिळालेले काम तीन वर्षांनंतर ठाणे मनपाच्या भोंगळ कारभारामुळे मध्येच सोडून जावे लागले. त्यामुळे केलेल्या कामाचा मोबदला मागील सव्वा वर्षांपासून न मिळाल्याने काम बंद केले.

ठाणे महानगरपालिकेच्या ७393 अधिकारी, कर्मचार्‍यांचा पगार, त्यांची कामावरील उपस्थिती आणि त्यानुसार त्यांना मिळणारा पगार याची संगणकीय नोंद मागील दोन वर्षांपासून ठेवण्याचे काम आर्यंश इंडस्ट्रीज ही आयटी कंपनी करीत होती. मात्र ठाणे मनपाला वारंवार स्मरणपत्र, थकबाकीबाबत लेखी विचारणा केल्यानंतरही केवळ आश्वासनांपुढे काहीच पदरात पडले नाही. त्यामुळे कंत्राटदार वैतागून काम सोडून निघून गेले. त्यामुळे ऐन दिवाळीला काही कर्मचार्‍यांचे पगार झालेले नाहीत तर काही कर्मचार्‍यांच्या पगारात तफावत आहे. या प्रकरणामुळे ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे प्रचंड तणावाखाली असून ऐन दिवाळीतच कर्मचार्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. ठामपाच्या 26 विभागांना एकत्र करुन पेपरलेस पद्धतीचे ई-गव्हर्नन्स करण्याचे कंत्राट 2014 अखेरीस आर्यंश इंडस्ट्रीजला मिळाले. महासभेत मंजुरी घेऊन याबाबतची वर्कऑर्डर ऑक्टोबर 2015 साली देण्यात आली.

- Advertisement -

त्यानंतर ई-गव्हर्नन्सच्या कामाला सुरुवात झाली. दोन फेजमध्ये असणार्‍या कामात सर्व विभागांसाठी सॉफ्टवेअर बनविणे आणि सर्व विभाग एकमेकांशी संलग्न राहण्यासाठी एक सॉफ्टवेअर बनवण्याची जबाबदारी आर्यंश कंपनीवर टाकण्यात आली होती. यासोबत ठाणे मनपाच्या 7393 कर्मचार्‍यांची उपस्थिती, सुट्ट्या, मानधन, भत्ते, पीएफ आणि इतर वैयक्तिक माहिती जमा करून त्याची नोंद करणे आणि पे रोल बनवून ठाणे मनपाच्या आयटी विभागाला सुपूर्द करणे असे कामाचे स्वरुप होते.

पहिल्या फेजमध्ये ऑक्टोबर 2015 ते जून 2017 पर्यंत महत्त्वाच्या विभागांसाठी सॉफ्टवेअर बनवण्यात आले. जुलै 2017 ते सप्टेंबर 2018 पर्यंत वर्षभर ठाणे मनपाच्या सर्व कर्मचार्‍यांच्या पगाराचा डाटा आर्यंश कंपनीच बनवत होती. मात्र मागील तीन वर्षांपासून आर्यंश कंपनीला केवळ 68 लाख 69 हजार 878 रुपये एवढीच रक्कम अदा केली. तर दोन वर्षांपासूनची थकबाकी अशी मिळून 2 कोटी 12 लाख रुपये अजूनही ठाणे महापालिकेने प्रामाणिकपणे काम करुनही दिले नसल्याचे आर्यंश कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर संदीप साळुंखे यांनी सांगितले.

मात्र मागील 14 महिन्यांची असणारी थकबाकी 2.12 कोटी रुपये देण्याबाबत जुलै 2018 पासून वारंवार 10 ऑक्टोबरपर्यंत 10 स्मरणपत्रे पाठवूनही ठाणे महापालिकेला गांभीर्य वाटले नाही. त्यामुळेच अखेर नाईलाज झाल्याने दोन आठवडे अगोदर लेखी पत्रव्यवहार करून आम्ही काम बंद केल्याचे साळुंखे यांनी सांगितले. मात्र आमच्याकडील सर्व कर्मचार्‍यांची माहिती आम्ही 20 ऑक्टोबर रोजी ठाणे महापालिकेचे आयटी विभागप्रमुख स्वरुप कुलकर्णी यांच्याकडे पाठवली. कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात घालवण्याचा आमचा कोणताही उद्देश नव्हता, पण सव्वा वर्षांपासून आम्हालाही ठाणे महापालिकेने आमच्या कामाचा मोबदला म्हणून एक रुपयाही दिलेला नाही. त्यामुळे आमच्या अनेक कर्मचार्‍यांचा गणेशोत्सव, दसरा आणि आता दिवाळीही अंधारातच जाणार आहे, याकडेही त्याने लक्ष वेधले. (‘आपलं महानगर’कडे याबाबतचा सर्व पत्रव्यवहार उपलब्ध आहे.)

असे असले तरी ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मते प्रारंभापासूनच या कंपनीकडे अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक माहिती योग्यरित्या नसल्यामुळे ठाणे पालिकेने आर्यंश आयटी कंपनीकडे लेखी तक्रारी केल्या. तरीही कंपनीच्या तांत्रिक विभागात सुधारणा झाली नाही. त्यामुळे आम्ही त्यांची 1 कोटी 20 लाख रुपये अनामत रक्कम जप्त केली आहे. आता तर ऐन दिवाळीत कर्मचार्‍यांचे पगार न काढता या कंपनीने ब्लॅकमेल करीत काम थांबवले, त्यामुळेच काही कर्मचार्‍यांचा पगार अजूनही झाला नाही. आर्यंश कंपनीमुळे ठामपाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे पगार रखडले आहेत. तर काही कर्मचारी, अधिकार्‍यांना निम्मेच पगार मिळाल्याची कबुली एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’ला दिली.

दिवाळी सण तोंडावर आला असताना कर्मचारी, अधिकार्‍यांचे पगार न झाल्याने पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या विषयात लक्ष घालत कारवाईचे आदेश दिले आणि कंपनीचा करार रद्द केला. आर्यंश कंपनीची 1 कोटी 20 लाख रुपये अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी आयटीच्या सेवानिवृत्त अधिकार्‍यांना सोबत घेण्याचे ठामपाने ठरवल्याचेही तो अधिकारी म्हणाला.

तीनदा पत्र लिहिले होते

आर्यंश इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या कामाचे पैसे मिळावेत म्हणून ठाणे महानगरपालिकेकडे सातत्याने पत्र व्यवहार केला. २३ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनला पहिल्यांदा पत्र लिहिले. मात्र तरीही महापालिकेकडून त्यांच्या कामाच्या पैशाबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ७ सप्टेंबर २०१८ आणि १० सप्टेंबर २०१८ असे दोनदा आर्यंश इंडस्ट्रीज कंपनीने पत्र लिहून ठाणे महानगरपालिकेला अवगत केले. मात्र तरीही पालिका प्रशासनाने त्यांच्या बिलाबाबत कोणतीही हालचाल केली नाही. विशेष म्हणजे १० सप्टेंबर २०१८ रोजी लिहिलेल्या पत्रात आर्यंश इंडस्ट्रीजने, आमच्या कामाचा मोबदला मिळाला नाहीतर नाईलाजाने आमचे काम बंद करावे लागेल, असा इशाराही दिला होता. मात्र महापालिकेच्या आठमुठ्या कामकाजामुळे आर्यंश इंडस्ट्रीज आणि ठाणे महानगरपालिका कर्मचारी, अधिकार्‍यांची दिवाळी अंधारमय झाली.

३६९५ कोटींचे बजेट आणि  २ कोटी १२ लाख जड

ठाणे महानगरपालिकेचेे बजेट ३६९५ कोटी रुपयांचे आहे. आर्यंश इंडस्ट्रीज ही कंपनी गेल्या दोन वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेच्या ७393 अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा पगार, त्यांची कामावरील उपस्थिती आणि त्यानुसार त्यांना मिळणारा पगार याची संगणकीय नोंद करण्याचे काम करते. मात्र त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मागील सव्वा वर्षांपासून मिळालेला नाही. ठाणे महानगरपालिकेचे बजेट ३६९५ कोटी रुपयांचे आहे. अशा महानगरपालिकेने आर्यंश इंडस्ट्रीज या कंपनीचे २ कोटी १२ लाख रुपये थकवले. त्याबाबत आर्यंश कंपनीने ऑगस्ट महिन्यापासून सतत तीनवेळा महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. त्यांना आपल्या थकबाकीची वारंवार आठवण करून दिली. मात्र तरीही महापालिका प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे काम बंद करण्याशिवाय कंपनीकडे पर्याय नव्हता. आर्यंश इंडस्ट्रीजची थकबाकी देण्याऐवजी महापालिकेने त्यांची अनामत रक्कम १ कोटी २० लाख जप्त केली. हा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार असल्याची टीका होत आहे.

आर्यंश कंपनीशी ई-गव्हर्नन्स करार 5 वर्षांसाठी किंमत 11 कोटी

ऑक्टोबर 2015 ते ऑक्टोबर 2020 होती कराराची मुदत

तीन वर्षांचे आतापर्यंत दिले केवळ 68 लाख रुपये

आर्यंश कंपनीची थकबाकी 2 कोटी 12 लाख रूपये

कंपनीचा करार रद्द करण्याअगोदर नोटीसही दिली नाही

ठाणे मनपाने जप्त केली अनामत रक्कम 1 कोटी 20 लाख

आतापर्यंत या कंपनीला पालिकेने 68 लाखांचे बिल दिले असून यापुढील सुमारे 2 कोटी 10 लाखांचे बिल रोखून धरले आहे. प्रशासनाच्या ई-गव्हर्नन्स हायटेक कारभाराला अडथळा आणणार्‍या आयटी कंपनीचे करार रद्द करून आम्ही त्यांची सुरक्षा अनामत रक्कम 1 कोटी 20 लाख रुपये जप्त केली आहे.
– संदीप माळवी, उपायुक्त,जनसंपर्क अधिकारी, ठामपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -