ठाणे यंदाही ‘बुडणार’, नालेसफाई कागदावरच

ठाण्यात अद्याप नालेसफाई नाही

सुबोध शाक्यरत्न ठाण्यातील अनेक नाले केरकचरा, प्लॅस्टिकने भरलेले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही ठाणे शहर जलमय होण्याचा धोका आहे. तसेच नालेसफाईची कामे वेळीच पूर्ण न झाल्याने त्यासाठी संबंधित यंत्रणांकडून करण्यात येणारा खर्च नाल्यात जाण्याची शक्यता आहे. नाल्यांची स्वच्छता हा भ्रष्टाचारातील हात की सफाई करण्याचा विषय झाल्याची टीका राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ढिम्म पालिका, उदासीन सरकारी यंत्रणा आणि कंत्राटदारांचे ढिसाळ काम यामुळे ठाणेकर यंदाही पावसाळ्यात भ्रष्टाचाराच्या गाळात बुडण्याची शक्यता आहे.

ठाण्यातील नालेसफाईची पाहणी करताना अधिकारी

नालेसफाईच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचे ठेके देतात
ठाणे शहरामध्ये सुमारे १३२ कि.मी. लांबीचे १३ मोठे व ३० छोटे नाले आहेत. नालेसफाईची कामे अनेक ठेकेदारांना देण्यात आली आहेत. या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचे ठेके देण्यात आले आहेत. यंदा पावसाळा लवकर येणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. त्यामुळे नालेसफाईची कामे तेवढ्याच वेगाने आणि तत्परतेने करण्याची गरज होती. मात्र, अद्यापही ठाणे शहरातील नाल्यांची सफाई पूर्ण झालेली नाही. ठाणे पालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पत्रकारांसह ठामपाच्या अधिकाऱ्यांसोबत कचऱ्याने भरलेल्या या नाल्यांची पहाणी केली. ठाण्यातील नालेसफाईबाबत प्रत्येक पावसाळ्यातील नेहमीचे रडगाणे यंदाही सुरूच आहे. मोठा पाऊस आला की नाल्यातील कचरा वाहून जातो आणि ठामपाचे अधिकारी आम्ही साफसफाई केली असल्याचे दाखवत असतात. ही बाब प्रत्यक्षात कळावी यासाठी पाटील यांनी हा दौरा आखल्याचे कळते.

ठाण्यात घाणीचे साम्राज्य

अद्याप नालेसफाई झाली नाही 
ठाण्यातील किसननगर, राबोडी, नळपाडा, वाल्मिकी नगर, इंदिरा नगर, साठे नगर, वागळे इस्टेट, या झोपडपट्टीवजा परिसरातील नालेसफाई अद्याप झालेली नाही. ती कधीच होत नसल्याची तक्रारही यावेळी अनेक नागरिकांनी दिली. इतकेच नव्हे तर शहराच्या अनेक भागांतील नालेसफाई अद्यापही रखडलेली आहे. शिवाय, ज्या ठिकाणी नालेसफाई करण्यात आली आहे त्याचा गाळ नाल्याच्या काठावरच ठेवण्यात आलेला आहे. कंत्राटदाराच्या चालढकलपणामुळे हाच गाळ पुन्हा नाल्यात जाऊन पाणी तुंबण्याची घटना घडत असतात. मात्र याकडे ठामपाचे अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. तसेच अनेक ठिकाणी पुलाखाली कचरा साचला आहे.

ठामपाची वर्षानुवर्षे ही हाथकी सफाई आहे. ही नालेसफाई नसून केवळ खिसे भराई आहे. त्यामुळेच आजपर्यंत यामध्ये अनेकांचे मृत्यू झाले आहेत. या सर्वाला जबाबदार ठाणे महानगरपालिकाच आहे
– जितेंद्र आव्हाड, नेते राष्ट्रवादी काँग्रेस

नालेसफाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही
दरवर्षी अशाच पद्धतीने नाल्यांची सफाई केली जाते. यंदाची नालेसफाई पाहता, दुर्घटना घडण्याच्या शक्यता अधिक आहेत. नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करूरुनही शहरातील नागरिकांची पाणी तुंबण्यापासून सुटका होत नाही. नालेसफाई करणाऱ्या ठेकेदारांवर तसेच संबधित अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने हे काम प्रामाणिकपणे करण्यात येत नाही. डोळ्यावर पांघरूण घेतलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना या विषयाकडे पाहण्यास वेळ नसल्यानेच ठाणेकरांना पूरस्थितीला तोंड द्यावे लागते. किमान यंदाच्या पावसाळ्यात तरी ठाणेकरांवर अशी वेळ येऊ नये, यासाठी आयुक्तांनी स्वत:हून लक्ष घालून नालेसफाईचे काम गांभीर्याने होईल, याची दक्षता घ्यावी; तसेच, जर पूरस्थिती निर्माण होऊन जीवित, वित्तहानी झाल्यास संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here