घरमुंबईठामपाच्या कारवाईवर ठाण्यातील डॉक्टरांचा आक्षेप

ठामपाच्या कारवाईवर ठाण्यातील डॉक्टरांचा आक्षेप

Subscribe

न्यायालयात दाद मागणार

मागील आठवड्यात ठाण्यातील सुमारे 15 हॉस्पिटल्सवर ठाणे महानगरपालिकेने कारवाई केली. अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव, इमारतींना ओसी, सीसी नसल्याच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली. मात्र, कोणत्याही नर्सिंग होमवर कारवाई करताना कायद्यानुसार किमान एक महिन्याची नोटीस बजावणे आवश्यक असते. ठामपा प्रशासनाने केवळ 48 तास आधी नोटीस दिली. 3 मे रोजी रात्री 8च्या नंतर सर्वांना नोटिसा देण्यात आल्या. आणि 6 मे रोजी कारवाई करण्यात आली. त्यातही मधले दोन दिवस शनिवार, रविवार असल्याने आम्हाला ही कारवाई रोखता आली नाही. हा सर्व प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. या कारवाईवर आक्षेप नोंदवत याविरोधात 13 मे रोजी सर्व डॉक्टर्स न्यायालयात दाद मागणार आहेत. याप्रकरणी 12 मे रोजी ठाण्यात डॉक्टरांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप परिषदेत डॉ. परमिंदर पांडे यांनी ही माहिती दिली.

केवळ 48 तासात रुग्णालयातील रुग्णांना अन्यत्र हलवणे ही गोष्ट शक्य नव्हती. मात्र, ठामपाने रुग्णांना बाहेर काढून त्यांचे कोणतेही ऐकून न घेता ही जाचक कारवाई केल्याने डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली असून, भीती पसरली आहे. अग्निसुरक्षाबाबत सुरू असलेल्या याचिकेवर मागील वर्षभरापासून सुनावणी होत होती. मात्र, याबाबत डॉक्टरांना अथवा त्यांच्या कोणत्याही संघटनेला काहीही कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही सुनावणी एकतर्फीच झाली. सुनावणी करताना न्यायालयाने डॉक्टरांची बाजूच ऐकली नाही. ती बाजू मांडण्यासाठी आता सर्व डॉक्टर न्यायालयात जाणार आहेत. ठाण्यात सुमारे 375 खाजगी रुग्णालये आहेत. त्यापैकी 81 रुग्णालयांवर कारवाईचे आदेश आहेत. तर 20 रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यात बहुतांश इमारतीत खाजगी रुग्णालये आहेत. सन 2018 पर्यंत या सर्वांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतर अचानक कारवाई करण्यात आली. नर्सिंगहोम कायद्यानुसार एकदाच फायर परवाना आवश्यक आहे. त्यानंतर नूतनीकरण करणे असा नियम असतानाही ही कारवाई करण्यात आली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

या हॉस्पिटल्सना फटका
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आलेले नर्सिंग होम्स. लोकमान्य नगर येथील सावित्री लाईफ केअर हॉस्पिटल, श्रीनगर येथील प्रथमेश हॉस्पिटल. शांतीनगर रॉड नं 27 येथील धन्वंतरी नर्सिंग होम, साठे नगर वागळे इस्टेट येथील साईकृपा हॉस्पिटल, शिवसाई सोसायटीमधील ऑर्बिट हॉस्पिटल. ढोकाळी येथील ढोकाळी हेल्थ केअर, मनोरम नगर येथील प्रगती हॉस्पिटल, बाळकूम नाका येथील ओंकार हॉस्पिटल, मुंब्रा अमृतनगर श्री कॉम्प्लेक्स अरमान हॉस्पिटल, मुंब्रा साई सुमन अपार्टमेंट येथील श्री साई मुंब्रा हॉस्पिटल, बळीराम प्लाझा दिवा येथील हरदेव नर्सिंग होम, श्रीरंग सोसायटीमधील आरंभ हॉस्पिटल, केसल मिल जवळ कोलबाड नाका येथील अक्षय सर्जिकल आणि मॅटर्निटी होणं, गौतम चेंबर्स महापालिका शाळा 13 खोपट येथील कुटुंब नियोजन आदर्श केंद्र आणि कळवा येथील कृष्णाई केअर.

1994 पूर्वीच्या इमारती असल्यास त्याला ओसी आणि सीसीची गरज नाही. त्यानंतरच्या इमारतींना परवानगी आणि अग्नी सुरक्षा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिका केवळ न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत आहे. यामध्ये कोणताही दुजाभाव नाही. याप्रकरणी पालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयांना एक वर्षापूर्वी नोटीस बजावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या निकालानुसार कारवाई केलेली आहे आणि उर्वरित रुग्णालयांवरही लवकरच कारवाई करण्यात येईल
-शशिकांत काळे
अग्निशमन विभाग प्रमुख, ठाणे महानगरपालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -