CoronaVirus: धक्कादायक! सफाई कर्मचारीच सांगतोय, पालिकेने साधे मास्कही दिले नाहीत

स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या सफाई कामगारांना आरोग्याच्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणत्याच सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या नसल्याचा प्रकार ठाणे महापालिकेत उघड झाला आहे.

Thane
Thane municipal office
ठाणे महापालिका

एकिकडे करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे मात्र स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या सफाई कामगारांना आरोग्याच्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणत्याच सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या नसल्याचा प्रकार ठाणे महापालिकेत उघड झाला आहे. ठाणे महापालिकेने सफाई कामगारांना तोंडाला लावण्यासाठी साधे मास्कही दिलेले नाहीत. अशाच परिस्थितीत ते स्वच्छतेचे काम करत आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका सफाई कामगारांच्या जीवाशी खेळतेय का? या प्रकरणी ठाणे महापालिकेचे नव्याने रूजू झालेले आयुक्त विजय सिंघल, महापौर नरेश म्हस्के याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न यावेळी उपस्थित हेात आहे.

हेही वाचा – Coronavirus Live Update: प्रत्येक कामगाराला २ हजार रुपयांचा लाभ मिळणार – निर्मला सीतारामन

palika worker
पालिका कर्मचारी (छाया – अमित मार्कंडे)

सध्या देशभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्रच बंद पुकारण्यात आला आहे. रूग्णालयात काम करणारे डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारी तसेच पाणी-वीज विभागातील कर्मचारी आणि शहराची स्वच्छता राखणारे सफाई कर्मचारी यांना ‘बंद’मधून वगळ्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडावर मास्क आणि सॅनिटायझरने हातांची सफाई करण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. करोनावर मात करायची असेल तर स्वच्छता राखणे आणि गर्दी टाळणे, असे आवाहन सर्वच प्रशासकीय व सरकारी यंत्रणेकडून केले जात आहेत. मात्र ठाणे महापालिकेने स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या सफाई कामगारांना तोंडाला लावण्यासाठी साधे मास्कही उपलब्ध करून दिले नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

सफाई कर्मचाऱ्यानेच केला खुलासा 

महापालिकेकडून मास्क मिळाले नसल्याचे खुद्द पालिकेतील नरेश शिंदे नामक एका सफाई कामगाराने सांगितले. त्यामुळे अनेक सफाई कर्मचारी हे तोंडाला रूमाल बांधूनच साफसफाई करतात तर अनेक जण तोंडाला काहीही न लावताच साफसफाई करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे सफाई कामगार असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. ठाण्यात करोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. आठ जण हे होम क्वारंटाईन आहेत. असे असतानाही सफाई कामगारांना साधे मास्कही पालिकेकडून पुरवण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जनतेला स्वच्छतेचे धडे देणारी ठाणे महापालिका आणि पालिकेतील लोकप्रतिनिधी हे पालिकेच्या सफाई कामगारांच्या सुरक्षेकडे लक्ष देतील का?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

गर्दीची ठिकाणं निर्जंतुकीकरणाची मोहीम

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील गर्दीचे ठिकाणे, बस डेपो, रेल्वे स्टेशन्स आणि मार्केट परिसरात निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवली जात आहे. करोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रामध्ये फुटपाथ, विविध मार्केटस, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, भाजी मार्केट, फिश मार्केट, गर्दीची ठिकाणे आणि सर्वच सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला होता. त्यानुसार प्रत्येक प्रभाग स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असून १० ट्रॅक्टर्स, ८० स्प्रेईंग मशीन्स,अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि जवळपास १४० कर्मचारी या कामासाठी तैनात करण्यात आली आहे. महापालिकेतील अग्निशमन दलाच्या जवानांकडून गर्दीची ठिकाणी असलेल्या सर्वच परिसरात औषध फवारणी करून र्निजंतुकीकरण केले जात आहे. ठाणेकर नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करून नये, घरातच राहावे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

chemical-spray-thane
निर्जंतुकीकरणाची मोहीम (छाया – अमित मार्कंडे)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here