ठाणे महापालिका नौपाडा प्रभाग समितीची इमारत धोकादायक

अवघ्या ३० वर्षातच या इमारतीला घरघर लागल्याने पालिकेच्या कारभाराबाबत शंका व्यक्त होत आहे.

Thane
Mayor Naresh Mhaske meeting with officers take for Coronavirus solution
ठाणे महापालिका

ठाण्यातील बहुचर्चित शाहू मार्केट अर्थात नौपाडा प्रभाग समिती इमारत धोकादायक ठरली आहे. त्यामुळे आता शाहू मार्केटमधील महापालिकेची कार्यालये आता गावदेवी मंडईतील इमारतीत हलवली जात आहेत. अवघ्या ३० वर्षातच या इमारतीला घरघर लागल्याने पालिकेच्या कारभाराबाबत शंका व्यक्त होत आहे.

…म्हणून भाजी मंडईचे गाळे भाड्याने दिले

नौपाड्यामध्ये मोठा गाजावाजा करून शाहू मार्केटची इमारत उभारण्यात आली. या शाहू मार्केटमध्ये एक मजला महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निवासाकरिता, एक मजला वस्तुसंग्रहालयासाठी आणि इमारती खाली भाजी मंडई उभारण्यात आली होती. मात्र या भाजी मंडईमधील गाळ्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर या गाळ्यांमध्ये रद्दीपासून सहकारी ग्राहक पेठेपर्यंत अनेकांना जागा भाड्याने देण्यात आल्या. काही जागेत महापालिकेची कार्यालयं थाटण्यात आली. तर वस्तुसंग्रहालय हलवून तिथेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना राहण्यासाठी जागा देण्यात आली.

पार्कींग प्लाझा उभारणार

गेल्या ३० वर्षात या इमारतीची दुर्दशा झाली आहे. या इमारतीची कधीही रंगरंगोटी अथवा दुरूस्ती करण्यात आलेली नाही. अनेकदा स्लॅबचे पोपडे पडण्याचे प्रकार घडले. इमारतीच्या पिलरलाही चिरा गेल्या. आता तर ही इमारत धोकादायक झाल्यामुळे या इमारतीतील कार्यालयं हलवण्यात येत आहेत. महापालिकेने अशा अनेक इमारतींना धोकादायक ठरवून २४ तासात रिकाम्या करून घेतल्या. आता तीच वेळ महापालिकेवर आली आहे. आता शाहू मार्केटच्या जागी पार्कींग प्लाझा उभारण्याची योजना आहे.