घरमुंबईठाणे पालिकेची स्मार्ट वॉटर मीटर योजना वादात

ठाणे पालिकेची स्मार्ट वॉटर मीटर योजना वादात

Subscribe

आदेश मागे घेण्याचे आयुक्तांचे निर्देश

ठाणे महापालिकेची महत्त्वाची असलेली स्मार्ट मीटर योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. शहरात सुरुवातीला केवळ कमर्शियल आणि सोसायटीला मीटर बसवण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश आहेत. असे असताना अनेक ठिकाणी झोपडपट्टी भागात हे मीटर बसवण्यात आले असल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी उघड केली असल्याने या सर्व प्रकारामुळे सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली. झोपडपट्टी भागातही मीटर बसून संबंधित एजन्सीचा बिले काढण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी सभागृहात केला. त्यानंतर मात्र आपली बाजू सावरण्यासाठी जर झोपडपट्टी भागात मीटर बसवण्याची कामे सुरू असतील तर ती त्वरित थांबवण्यात येतील, असे आदेश आयुक्तांनी दिले असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सभागृहात सांगितले.

आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमी ऑटोमेटीक मीटर अशा पध्दतीने मागील 12 वर्षे पालिका नळ संयोजनांवर मीटर बसविण्यासाठी विविध पध्दतीन निविदा काढल्या होत्या, परंतु अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आता स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता तब्बल 1 लाख 40 हजार मीटर बसविले जाणार असून आतापर्यंत 22 हजारांहून अधिक मीटर बसविले गेले आहेत.

- Advertisement -

घोडबंदर, माजिवडा, शहरातील काही भाग अशा भागात हे मीटर बसविले गेले आहेत. मात्र, सुरुवातीला केवळ कमर्शियल आणि सोसायटींना हे मीटर बसवण्याचे आदेश असताना महापौरांच्या मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत, दिवा, मुंब्रा, कोलशेत अशा अनेक झोपडपट्टी भागात हे स्मार्ट मीटर बसवण्यात आले असल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे आणि इतर नगरसेवकांनी उघड केली आहे. जर एका प्रभागात मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले असेल तर त्या संपूर्ण सभागृहात मीटर बसवण्यात यावे, अशी मागणी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली, तर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी देखील आपल्या प्रभागात अजूनही स्मार्ट मीटर बसवण्याची विचारणा होत असल्याने नेमका हा काय प्रकार आहे? असा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

यावर स्पष्टीकरण देताना कार्यकारी अभियंता विकास ढोले यांनी सुरुवातीला स्लममध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर केवळ कमर्शियल आणि सोसायटींनाच हे मीटर बसवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. ढोले यांच्या उत्तरावर नगरसेवक समाधानी न झाल्याने अखेर प्रशासनाची बाजू सावरण्यासाठी खुद्द पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व वस्तुस्थिती सभागृहात मांडली. शहारत 5 लाखांपेक्षा अधिक नळकनेक्शन धारक असून एवढ्या कनेक्शनवर स्मार्ट मीटर बसवणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्यात केवळ 1 लाख 40 हजार मीटर बसवण्यात येणार असून त्यानंतरच्या टप्प्यात सर्व ठिकाणी मीटर बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या उत्तरावर देखील नगरसेवक समाधानी न झाल्याने ज्या ठिकाणी अशाप्रकारचे झोपडपट्टी भागात मीटर बसवण्याची कामे सुरू करण्यात आली आहे ती कामे त्वरित थांबवण्यात यावी, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले असल्याची माहिती सभागृहात अर्जुन अहिरे यांनी दिले असल्याने या वादावर अखेर पडदा पडला.

- Advertisement -

अशी आहे स्मार्ट वॉटर मीटर योजना
पाणी गळती आणि पाणी चोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी या उद्देशाने हे स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. यासाठी 131 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. त्यानुसार मागील चार महिन्यापासून हे मीटर बसविण्यास सुरवात झाली आहे. शहरातील विविध भागात अशा प्रकारे स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. त्यानुसार आतार्पयत 22 हजाराहून अधिक मीटर बसविण्यात आले आहेत. या कामासाठी स्मार्ट सीटी अंतर्गत 93 कोटींचा खर्च केला जात असून पुढील निगा आणि देखभालीसाठीचा पुढील पाच वर्षाचा खर्च हा पालिका करणार आहे. यासाठी खाजगी एजेन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. हे मीटर घोडबंदर भागातील सोसायटी, झोपडपट्टी भाग, माजिवडा, वागळे इस्टेट, शहरातील काही भाग अशा पध्दतीने हे मीटर बसविण्यात आले आहेत.

या मीटरमुळे ग्राहक जेवढे पाणी वापरणार आहेत, तेवढेच बिल त्यांना भरावे लागणार आहे. पूर्वी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून झोपडपट्टी भागासाठी 130 रुपये प्रमाणो बिल आकारले जात होते. त्यानुसार कुटुंबातील पाच व्यक्तीनुसार 450 लीटर पाणी हे दरवर्षी वापरले जाते असा अंदाज आहे. त्यानुसार महिन्याचे बिल त्या कुटुंबासाठी मीटरप्रमाणो 100 ते 110 पर्यंत येऊ शकणार आहे, परंतु जास्तीचे पाणी वापरल्यास जास्तीचे बिल येणार आहे. पूर्वी इमारतींसाठी महिना 180 रुपये आणि बैठ्या चाळींसाठी 130 च्या आसपास पाणी आकार घेतला जात होता, परंतु आता स्मार्ट मीटरचे दर हा पालिकेने निश्चित केले आहेत. 0 ते 15 हजार लीटर पर्यंत 7.50 रुपये, 15 हजार ते 20 हजार पर्यंत 10 रुपये, 20 हजार ते 24 हजार पर्यंत 15 रुपये आणि 24 हजारांच्या पुढे 20 रुपये असा दर हजार लिटरमागे आकारला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -