ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर कोरोना मुक्त

Thane police commissioner vivek phansalkar cured from corona

ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर कोरोनामुक्त झाले असून आजच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान त्यांनी कोरोनावर मात केली असून आजच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना खोकला आणि ताप येत असल्यामुळे त्यांनी कोरोनाची तपासणी केली होती. या तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ते मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. पोलीस आणि नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, यासाठी फणसाळकर हे कार्यालयात तसेच ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या सर्वच परिमंडळातील पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत होते.

विवेक फणसाळकर यांनी ट्विट करुन कोरोनावर मात केल्याची माहिती दिली आहे. “सर्वांच्या सदिच्छांमुळे आणि डॉक्टरांच्या उपचारांमुळे बरा झालो.. लवकरच संपूर्ण बरा होऊन पुनःश्च सेवेत रुजू होईन,” असं फणसाळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी परप्रांतीयांच्या घरवापसीसाठीही वैयक्तिक पातळीवर लक्ष दिलं होतं. मुंब्रा तसंच भिवंडीसारखा संवेदनशील परिसरही त्यांनी पिंजून काढला होता. पोलिसांमध्ये वाढते कोरोनाचे प्रमाण लक्षात घेता त्यांनी सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये काही सामाजिक संस्थांच्या मदतीने कोरोना तपासणी आणि उपचाराची मोहीम राबविली होती.