घरमुंबईत्या मोबाईलमुळे मुद्देमाल परत मिळाला

त्या मोबाईलमुळे मुद्देमाल परत मिळाला

Subscribe

प्रतिनिधी:मुंबई लोकल ट्रेनमधल्या प्रचंड गर्दीतून प्रवास करत असताना बर्‍याचदा आपल्या महत्वाच्या वस्तू गहाळ होत असतात. मोबाईल,पाकीट,आणि इतर मौल्यवान वस्तू हरवल्या तर त्या परत मिळण्याची शक्यता कमीच असते. पण या प्रवासादरम्यान एखादी मौल्यवान वस्तू असलेली बॅग गायब होवून त्या बॅगेत असणार्‍या एका मोबाईलमुळे ८० हजारांचा ऐवज परत मिळाला तर ? अशीच एक घटना मुंबईतील मुलूंड स्थानकात घडली आहे. एका प्रवाशाची बॅग चोरीला गेली आणि त्या बॅगेत असणार्‍या एका मोबाईलवरून रेल्वे पोलिसांनी बॅगमालकाचा शोध घेवून मुद्देमाल सुपूर्द केला.
भांडूप पश्चिमेकडे असणार्‍या टंक रोडवर हरीजन कॉलनीमध्ये राहणारे आनंद कुमार हे सीएसटीच्या दिशेने जात होते. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने या गडबडीत त्यांच्याकडे असणाऱी बॅग कोणी लंपास केली हे त्यांनाही कळल नाही.

दरम्यान हरवलेली बॅग आता पुन्हा सापडणार नाही असा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्यांनी पोलीसात तक्रार न देता घर गाठले. दरम्यान मुलुंडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ड्यूटीवर असणार्‍या आरपीएफ जवांनाना एका ठिकाणी ही बॅग दिसून आली. बॅगेत ६० हजारांची गळ्यातली सोन्याची चैन,पाच हजार रुपयांची रोख रक्कम,१० हजार रुपये किंमतीची एक सोन्याची अंगठी, १५०० रुपयांचा जीओ मोबाईल आणि काही कपडे होते. मौल्यवान वस्तू असल्याने सुरुवातीला या साहीत्याचा मालक शोधून त्यांच्याकडे सोपवणे हे काम म्हणजे पोलिसांसमोर आव्हानच होते. मात्र यामध्ये बॅगेत असणार्‍या त्या मोबाईलमुळे खुप मदत झाली. आरपीएफ पोलिसांनी त्या मोबाईलमध्ये सेव्ह असणार्‍या बर्‍याच नंबरवर संपर्क केल्यांनंतर नातेवाईकांकडून त्या मोबाईलधारकाचा अखेर शोध लागला. पोलिसांनी मोबाईलचे मालक आनंद कुमार यांच्याशी बोलून झालेल्या प्रकाराची माहीती दिली आणि आनंद कुमार यांना दिलासा मिळाला. ८० हजार रुपये किंमतीचा ऐवज सुखरुप परत मिळणार असल्याने त्यांनी आपल्या पत्नीसह पोलीस मुलुंड रेल्वे पोलीस ठाणे गाठले.

- Advertisement -

मुलूंड आरपीएफ पोलिसांनी खात्री करून हा ऐवज त्यांचाच आहे हे लक्षात येताच सर्व मुद्देमाल त्यांना पुन्हा सोपवला आहे.
लोकलमधून प्रवास करत असताना एखादी गोष्ट चोरीला गेली अथवा हरवली तर ती मिळण्याची शक्यता कमीच असते पण पोलिसांनी योग्य त्या पद्धतीने तपास करुन हा महागडा ऐवज आनंद कुमार यांच्या स्वाधीन केल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -