घरमुंबईचार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या हत्येच्या गुन्ह्यांतील आरोपीस अटक

चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या हत्येच्या गुन्ह्यांतील आरोपीस अटक

Subscribe

गेल्या चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीस गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. तौशिफ अमीन मेमन ऊर्फ तौशिफ अनिस मोमीन ऊर्फ तौफिक दाढी असे या 27 वर्षीय आरोपीचे नाव आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी शिवाजीनगर पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले. गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात हनीफ सय्यद हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. त्याने त्याच्या राहत्या घराचे नूतनीकरण केले होते. त्यासाठी त्याला स्थानिक गुंडांकडून खंडणीसाठी धमकी दिली जात होती. मात्र त्याने खंडणीचा हप्ता देण्यास नकार दिला होता. याच कारणावरुन 20 मेला हनीफ सैय्यद याचे आठजणांच्या एका टोळीने अपहरण केले होते. त्याला लाथ्याबुक्यांनी तसेच सळईने बेदम मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण सुरु असतानाच एका तरुणाने त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात हनीफ हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याचावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी हनीफची पत्नी गौसिया हिच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी आठजणांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यात तौशिफ मेमनसह इतर तिघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. या वॉण्टेड आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच तौशिफ मेमन हा ओव्हल मैदानासमोरील मुंबई विद्यापीठाजवळ येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र इंदुलकर यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाच्या अधिकार्‍यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून तौशिफला शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला मोक्का कोर्टात हजर केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -