चोरीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेला आरोपी मनसेचा कार्यकर्ता

- मनपा निवडणूक रिंगणात दिलेल्या माहितीवरून कारवाई

Mumbai
in pimpri chinchwad ncp shivsena activist arrested
प्रातिनिधिक छायाचित्र

चोरीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एक आरोपीस चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपीने दोन वर्षांपूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र या निवडणुकीत त्याचा पराभव झाला. आरोपीचा शोध सुरु असताना ओशिवरा पोलिसांनी पालिका निवडणुकीत उभ्या असलेल्या 2 हजार 275 उमेदवारांची माहिती काढून या आरोपीला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

निलेश शांताराम मुदराळे असे या आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध ओशिवरासह समतानगर आणि दिडोंशी पोलीस ठाण्यात दंगलीसह गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी निलेश हा जोगेश्वरी परिसरात राहत होता. मात्र पुर्नविकासानंतर तो जोगेश्वरीतून दिडोंशी परिसरात राहण्यासाठी गेला होता. 1995 साली त्याच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. खटल्याच्या दोन ते तीन सुनावणी हजर राहिल्यानंतर तो पळून गेला होता. सतत सुनावणीदरम्यान तो गैरहजर राहत असल्याची त्याची अंधेरीतील स्थानिक कोर्टाने गंभीर दखल घेत त्याला फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते.

या आदेशानंतर त्याच्या अटकेसाठी ओशिवरा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. याच दरम्यान निलेश हा महानगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत एका पक्षाचा उमेदवार म्हणून उभा होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या 2 हजार 275 उमेदवारांची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. निवडणूक आयोगाकडून ही माहिती मिळाल्यानंतर या उमेदवारांची माहिती काढत असताना वार्ड क्रमांक 47 मध्ये निलेश हा निवडणूक रिंगणात मनसेच्या वतीने उभा होता असे तपासात उघडकीस आले. त्यानंतर त्याच्या निवडणूक अर्जाची माहिती काढून त्याला दिडोंशी परिसरातून मंगळवारी ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.