आधी सटकला,नंतर पकडला

दोन चोर्‍या करणार्‍या चोरट्यास रंगेहाथ अटक

Mumbai
aaropi

चोरी केल्यानंतर अवघ्या पाच तासांत पुन्हा चोरीच्या उद्देशाने स्थानकात फिरून आपले सावज हेरणार्‍या एका आरोपीला सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी हा वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांत फिरुन चोरी करून फरार व्हायचा. पण काही तासांतच पुन्हा त्याच स्थानकात चोरीच्या उद्देशाने येऊन प्रवाशांना लुटत होता. राहुल रामदास तिवारी (२०) वर्षे असे या आरोपीचे नाव असून लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

६ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास दिपक रामदास भुवर (४८) हे सीएसएमटी स्थानकातून आपल्या सँण्डहर्स्ट इथल्या आपल्या घरी जायला निघाले होते. इतक्यात लोकलमध्ये चढत असताना एका चोराने त्यांची बॅग खेचून पलायन केले. दिपक भुवर यांनी त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत चोर पसार झाला होता. त्यामुळे त्यांनी सीएसएमटी लोहमार्ग रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास त्याच स्थानकात सदर चोरटा येऊन पुन्हा एकदा चोरी करण्याचा प्रयत्न करत होता.यावेळी त्याने आधी चोरलेली बॅगसुद्धा सोबत होती.

चोरी करताना पोलिसांनी रंगेहाथ त्याला अटक केली आहे. त्याने चोरलेल्या बॅगेतून इंटेक्स आणि व्हिवो कंपनीचे एकूण १९ हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त करून फिर्यादी दिपक भुवर यांना परत देण्यात आलेले आहेत. आरोपी राहूल तिवारी हा मुळचा मध्यप्रदेशचा रहिवासी असून मुंबईत त्याचे राहण्याचे ठिकाण नाही. रेल्वे स्टेशन परिसरात चोर्‍या करुन तो फुटपाथवर वास्तव्य करत असल्याची माहिती सीएसएमटी लोहमार्ग रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here