आत्महत्येस जबाबदार असलेल्या आरोपीला अटक

Mumbai
arrest
अटक

उलवे भागात राहणारे दिगंबर चव्हाण यांनी उंदीर मारण्याचे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर या आत्महत्येला जबाबदार असलेला आरोपी दिपक चव्हाण याला न्हावाशेवा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

या घटनेतील आरोपी दिपक चव्हाण याने मृत दिगंबर चव्हाण यांच्या मुलाची मारुती सुझुकी रिट्स कार भाडेतत्वावर घेतली होती. महिन्याभरानंतर कारचे 65 हजार रुपये भाडे मागण्यासाठी चव्हाण यांचा मुलगा क्षमिक गेला असता, आरोपी दिपक चव्हाण याने 5-6 दिवसात भाडे आणि कार परत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे क्षमिक याने काही दिवसानंतर पुन्हा त्याला फोन केल्यानंतर त्याने त्याची कार परत देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर दिगंबर चव्हाण हे स्वत: दिपक चव्हाण याला भेटण्यासाठी तळोजा येथे मुलासह गेले होते. मात्र, त्यांना तो सापडला नव्हता. त्यामुळे दिगंबर चव्हाण यांनी आरोपी दिपक चव्हाण याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, दिपक चव्हाण याने भाडेतत्वावर घेतलेल्या कारचे पैसे देण्यास तसेच त्यांची कार परत देण्यास टाळाटाळ करून त्याने दिगंबर चव्हाण यांना शिवीगाळ तसेच दमदाटी केली होती.

त्यामुळे दिगंबर चव्हाण यांनी मानसिक तणावाखाली येऊन पत्नी सुषमा चव्हाणसह उंदीर मारण्याचे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी क्षमिक चव्हाण याने दोघांना वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्याची आई बचावली. मात्र, वडील दिगंबर चव्हाण हे मृत पावले. दिगंबर चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दिपक चव्हाण याने कारचे 65 हजार रुपये भाडे न दिल्याने तसेच त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याने आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पोलिसांनी आरोपी दिपक चव्हाण याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. अखेर तो उलवे भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर न्हावाशेवा पोलिसांनी त्याला अटक केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here