घरमुंबईउत्तरपत्रिका पडल्या उघड्यावर

उत्तरपत्रिका पडल्या उघड्यावर

Subscribe

 रत्नागिरी उपकेंद्राचा अजब प्रकार

शिक्षकांची कमतरता, परीक्षा घेणे, निकाल लावण्यात विलंब यासारख्या अनेक प्रकरणांमधील विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना वारंवार बसतो. त्यामुळे विद्यार्थी हैराण झालेले असताना आता विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात उत्तरपत्रिकेचे संच उघड्यावर ठेवण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे उत्तरपत्रिकांची चोरी होऊन त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठाकडून गतवर्षी छापलेल्या उत्तरपत्रिकांवर असलेल्या नावाच्या रकान्यामुळे बराच गोंधळ झाला होता. या उत्तरपत्रिका रद्द करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार यावर्षी नावाचा रकाना नसलेल्या उत्तरपत्रिका विद्यापीठाकडून छापण्यात आल्या. उत्तरपत्रिका बंद खोलीत सुरक्षित ठिकाणी ठेवणे अपेक्षित असते. परंतु विद्यापीठाच्या रत्नागिरी केंद्राच्या आवारात तळमजल्यावर 20 ते 25 हजार जुन्या उत्तरपत्रिका व नव्याने छापण्यात आलेल्या उत्तरपत्रिका उघड्यावर ठेवण्यात आल्या आहेत. केंद्राच्या इमारतीचा दुसरा मजला हा रिकामा असून तेथे उत्तरपत्रिका ठेवता येऊ शकतात. पण त्याकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष करून त्या आवारात तळमजल्यावर ठेवण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

उत्तरपत्रिका ठेवलेल्या परिसरात विद्यार्थ्यांचा वावर असतो. त्यामुळे एखादा विद्यार्थी किंवा अन्य व्यक्तीकडून उत्तरपत्रिकेचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे. जुन्या उत्तरपत्रिका उघड्यावर ठेवण्याप्रमाणेच त्यांच्यावर विद्यार्थ्यांच्या नावाचा रकाना व्हाईटिंगने काढून परीक्षेला त्याचा वापर करणे आवश्यक आहे. पण त्यासाठी आवश्यक निधी विद्यापीठाकडून मंजूर करण्यात न आल्याने व्हाईटिंग लावण्यासाठी आवश्यक कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे उत्तरपत्रिकेवरील नावाचा रकाना तसाच असल्याने त्या उत्तरपत्रिकांचा वापर परीक्षेला वापर करण्यात आला नाही. रत्नागिरी उपकेंद्रात गुरुवारी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे यांनी अचानक भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सिनेट सदस्यांनी ही बाब विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुंसह परीक्षा नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिली. उपकेंद्रातील निष्काळजीपणा दाखविणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणीही सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली.

प्रभारी संचालकांकडून दुर्लक्ष
रत्नागिरी उपकेंद्राचे प्रभारी संचालकपद देवरूख कॉलेजचे डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्याकडे आहे. तेंडोलकर हे महिन्यातून एखाद दोन दिवसच येथे येतात. उपकेंद्राला पूर्ण वेळ संचालक नसल्यामुळे येथील कामकाजाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पूर्ण वेळ संचालक नेमण्याची मागणीही युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -