घरमुंबईकॉलेजांना दीडपट मूल्यांकन बंधनकारक

कॉलेजांना दीडपट मूल्यांकन बंधनकारक

Subscribe

मूल्यांकन टाळणार्‍या कॉलेजांची मान्यता रद्द होणार

मुंबई विद्यापीठात होणारा निकाल विलंब लक्षात घेता उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन टाळणार्‍या कॉलेजांवर यापुढे कठोर कारवाई होणार आहे. प्रत्येक कॉलेजला त्यांच्या कॉलेजातील तृतीय वर्षाची परीक्षा देणार्‍या विद्यार्थी संख्येच्या दीडपट उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे मूल्यांकन केल्यावर परीक्षा विभागातर्फे एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र संलग्नता, नियमितता, नैसर्गिक वाढ, प्रवेश क्षमता, पद्व्युत्तर पदवी अथवा संशोधन केंद्र, तसेच विद्यार्थ्यांची नोंदणी यासाठीचे प्रस्ताव सादर करताना आवश्यक राहणार आहे. यामुळे हे प्रमाणपत्र नसेल तर मान्यता कायम ठेवण्यात अडचण येऊ शकते.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ८९ अन्वये परीक्षेचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करणे विद्यापीठास बंधनकारक आहे. विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ४८(४) नुसार विद्यापीठ संलग्नित कॉलेजला तेथे कार्य करणार्‍या अध्यापकाला व अध्यापकेतर कर्मचार्‍यांना विद्यापीठाचे परीक्षा व उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन याबाबतच्या विहित केलेल्या नियमाप्रमाणे सहाय्य करणे व सेवा देणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने परिपत्रकाद्वारे विद्यापीठाने सर्व प्राचार्यांनी आपल्या कॉलेजमधील सर्व प्राध्यापकांना ऑनलाईन मूल्यांकन प्रणालीत टॅग करणे आवश्यक केले आहे. तसेच प्रत्येक कॉलेजने ऑनलाईन मूल्यांकन प्रणालीद्वारे ओएसएम मूल्यांकन केंद्र सुरू करणे बंधनकारक केले आहे.

- Advertisement -

तसेच कॉलेजातील अभ्यासक्रमासाठी नोंदणी असलेल्या विद्यार्थी संख्येच्या कमीत कमी दीडपट मूल्यांकन करणे बंधनकारक केले आहे. कॉलेजने प्रत्येक परीक्षेसाठी तपासलेल्या उत्तरपुस्तिका व प्राध्यापकांच्या संख्येसाठी मुंबई विद्यापीठाचे परीक्षा विभागाच्या केंद्रीय मूल्यांकन कक्षाचे उपकुलसचिव यांचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र संलग्नता, नियमितता, नैसर्गिक वाढ, प्रवेश क्षमता, पद्व्युत्तर केंद्र/संशोधन केंद्र तसेच विद्यार्थ्यांची नोंदणी याबाबत विद्यापीठास प्रस्ताव सादर करताना आवश्यक राहणार आहे. अशा स्वरूपाचे परिपत्रक विद्यापीठाने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी कॉलेजला पाठविले आहे.

प्रथम सत्राची परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. यामुळे निकाल वेळेवर जाहीर करणे ही विद्यापीठाची प्राथमिकता आहे. सर्व कॉलेज कमीत कमी दीडपट मूल्यांकन करतील, असा मला विश्वास वाटतो.
– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -