घरमुंबईएटीएस अधिकार्‍याला घातला गंडा

एटीएस अधिकार्‍याला घातला गंडा

Subscribe

बजाज फायनान्स कंपनीला दिलेल्या कागदपत्रांवरून फसवणूक ,०% फायनान्स कर्ज घेताय, सावधान

आपल्या घरात सर्व सुखसोयीच्या वस्तू असाव्यात हे स्वप्न प्रत्येक मध्यमवर्गीयाचे असते. मात्र महिन्याकाठी मिळणार्‍या पगारातून या सर्व सुखसोयीच्या वस्तू घेणे अशक्य होते. त्यामुळे बरेच जण फायनान्स कंपनीच्या माध्यमातून ०% व्याजासह हप्त्यावर वस्तू खरेदी करून आपली हौस भागवत आहेत. सुलभ हप्त्याने कर्ज देणार्‍या अनेक कंपन्या सध्या बाजारात ठाण मांडून बसलेल्या आहेत. मात्र या वस्तुंसाठी ग्राहकाकडून देण्यात येणार्‍या वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर करून ग्राहक आणि कंपनीची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाच्या एका पोलीस अधिकार्‍याची अशा प्रकारे फसवणूक झाली असल्याचे उघडकीस आल्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुंबईत दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक या पदावर असणारे अधिकारी यांनी जून महिन्यात परळ भोईवाडा येथून भवल इलेक्ट्रॉनिक या दुकानातून एल.जी. कंपनीचा एसी ’बजाज फायनान्स’ या कंपनीकडून सुलभ हप्त्यावर कर्ज घेऊन खरेदी केला होता. यासाठी या अधिकार्‍याने ’भवर इलेक्ट्रॉनिक’ या दुकानात असलेल्या बजाज फायनान्स या कंपनीचा प्रतिनिधी संदीप गुप्ता याला आधारकार्ड, पनकार्ड आणि बँक खात्याचा कॅन्सल धनादेश ही कागदपत्रे दिली होती.

- Advertisement -

दरम्यान, नोव्हेबर महिन्यात या अधिकार्‍याला एका मोबाईल फोन विमा कंपनीचे पत्र आले व त्यात तुम्ही बजाज फायनान्समधून कर्ज घेऊन मोबाईल फोन विकत घेतला असून त्याचा विमा काढण्यात आला असल्याचे कळवण्यात आले. मात्र आपण एसी घेतली असून मोबाईल फोन विकत घेतला नसल्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रथम भोईवाडा येथील दुकानदारकडे चौकशी केली. त्यानंतर बजाज फायनान्स कंपनीकडे पत्र व्यवहार करून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. बजाज फायनान्स कंपनीने त्यांना मोबाईल फोन घेतल्याची सर्व माहिती आणि त्या अधिकार्‍याने त्यासाठी दिलेली कागदपत्रे दाखवली.

आपल्या कागदपत्रांचा गैरवापर करून आपली फसवणूक झाल्यामुळे कळताच, या अधिकार्‍याने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इस्माविरुद्ध फसवणूक, बनावट दस्तऐवज प्रकरणी गुन्हा दाखल केला. या अधिकार्‍याने नोव्हेंबर महिन्यात बजाज फायन्सास कंपनीच्या गोरेगाव येथील कार्यालयात जाऊन तक्रार केली असता, अशाच प्रकारे भाईंदर या ठिकाणी देखील फसवणूक झाल्याची तक्रार आमच्याकडे आली असल्याचे बजाज फायनान्सचे तपास अधिकारी विजय गायकवाड यांनी त्या अधिकार्‍यांला सांगितले. या प्रकरणाचा तपास करीत असल्याचे गायकवाड म्हणाले.

- Advertisement -

बजाज फायनान्सकडून मिळणारे ०% फायनान्स
सध्या मुंबईतील बहुतांश होम अप्लायन्स शोरूममध्ये बजाजकडून ०% फायनान्स असे बोर्ड दिसतात आणि त्यांचे प्रतिनिधीही असतात.मोबाईल, लॅपटॉप, ओवन, फ्रिज, एसी, टीव्ही, डीव्हीडी, वॉशिंग मशीन्स, होम थिएटरसह घरी वापरण्यात येणार्‍या ०% व्याजाने कर्ज मिळते. या ऑफरला ग्राहक भुलतात आणि आपली कागदपत्रे संबंधित फायनान्स कंपन्यांना देऊन फसतात, असे प्रकार मुंबईत समोर येत आहेत.

मी बजाज  फायनान्स कंपनीकडून सुलभ हप्त्यावर एसी खरेदी केला होता. त्यासाठी दिलेल्या माझ्या कागदपत्रांचा गैरवापर करण्यात आला. त्या कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन मोबाईल फोन विकत घेण्यात आला असून त्याचा हप्ता माझ्या माथी मारण्यात आला होता. मात्र ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे मी फायनान्स कंपनीकडे पत्र व्यवहार केला असून भोईवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
-तक्रारदार, पोलीस  निरीक्षक, एटीएस

या प्रकरणी आमच्याकडे तक्रार आली असून आम्ही अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आमचा तपास सुरू आहे.
-रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोईवाडा पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -