घरमुंबईउल्हासनगरातील गोर गरीब मुलांनाही आधार रॉबिनहूड आर्मीचा

उल्हासनगरातील गोर गरीब मुलांनाही आधार रॉबिनहूड आर्मीचा

Subscribe

आपली नोकरी आणि दैनंदिन कामकाजातून वेळ काढून गरीब व अनाथ मुलांना शिक्षण आणि भोजन देण्याचे काम काही उच्च शिक्षित तरुण आणि तरुणी करीत आहेत. आपला हा उपक्रम ते रॉबिनहूड आर्मीच्या नावाने चालवित आहेत.उल्हासनगर येथील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या संजय गांधीनगर या झोपडपट्टीजवळ नुकतेच रॉबिनहूड आर्मीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी या संस्थेच्या सदस्या रचना नंदनवार आणि शीतल शर्मा यांनी आपल्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले, त्या म्हणाल्या की गेल्या दोन महिन्यांपासून येथे सातत्याने होणार्‍या शिकवणीमुळे अनेक मुलांना तर लिहता वाचता देखील यायला लागले आहे. या मुलांना शिकवण्यावरोबरच त्याच्या जेवणाची व्यवस्था देखील या आर्मी कडून केली जाते. मोठी हॉटेल, लग्न, वाढदिवसाचे समारंभ या ठिकाणी जाऊन उरलेले अन्न गोळा करून ते या मुलांना दिले जाते. आम्ही अंबरनाथमधील एका हॉटेल मालकाला या उपक्रमाची माहिती दिली. ती ऐकताच त्यांनी शेकडो मुलांची पोटं भरतील असे ताजे अन्न हॉटेल मालकाने द्यायला सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल मालक दिवाकर कांचन दर शनिवार आणि रविवार हॉटेलमधील उरलेले नाही तर ताजे अन्न या मुलांसाठी तयार करून देतात.

माझ्याशी जेव्हा रॉबिन हूड आर्मीच्या सदस्यांनी संपर्क साधला आणि आपल्या संस्थेची माहिती मला दिली, त्यावेळी मला ही संकल्पना आवडली. ही संस्था गरीब मुलांना केवळ अन्नच नाही तर शिक्षणदेखील देते. त्यामुळे मी मी मुलांना ताजे अन्न देण्याचे कबूल केले. माझा या उपक्रमात खारीचा वाटा आहे. याचे मला समाधान मिळते, अशी प्रतिक्रिया अंबरनाथचे हॉटेल मालक  दिवाकर कांचन यांनी दिली.

- Advertisement -

रॉबिनहूड आर्मी आणि फाउंडेशनच्या सदस्यांमध्ये अनेक जण प्रोफेसर, इंजिनियर, शिक्षक, डॉक्टर आहे. मात्र शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दोन दिवशी आपल्या व्यग्र कामातून वेळ काढून रॉबिनहूड आर्मीचे सदस्य अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि मुंबई परिसरात जाऊन अनेक ठिकाणी गोरगरिब गरजू मुलामुलींना शिक्षणाचे धडे देतात. त्यांना शिकवतात. यातील अनेक गरीब मुलांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असते. यातील अनेक मुले रस्त्यावर भीक मागून पोट भरतात. अशा मुलांना रॉबिनहूड आर्मीकडून जेवण आणि शिक्षण अशा दोन्ही गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केला जातात. शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी सदस्यांकडून मुलांसाठी विविध हस्त, चित्रकला उपक्रम राबवले जातात. त्यासाठीचा खर्च सदस्य स्वतः करतात. दर शनिवारी, रविवारी हा उपक्रम राबवला जातो.  2014 दिल्ली येथे निल घोसे याने ही आर्मी सुरू केली. देशातच नाही तर टोरंटो, आफ्रिका या देशातील देखील रॉबिनहुड आर्मी काम करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -