घरमुंबईनवी मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?

नवी मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?

Subscribe

मनपा आयुक्तांंकडून दुर्लक्ष

नवी मुंबई शहरातील घाणपाणी तसेच समुद्राच्या भरतीचे पाणी वाढल्यास पुन्हा ते खाडीमार्गे समुद्रात फेकणार्‍या वाशी सेक्टर 6 मधील मलनिःसारण केंद्राची इमारत अत्यंत धोकादायक झाली असून, ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते. याच मलनिःसारण केंद्राच्या हद्दीत गुरुवारी पादचारी पुलाचा काही भाग कोसळला होता. याची पाहणी करण्यासाठी आलेल्या मनपा आयुक्तांनी धोकादायक अशा मलनिःसारण इमारतीकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.

खाडी किनारी असलेल्या या मलनिःसारण केंद्राची इमारत सिडकोकालीन आहे. तब्बल 40 वर्ष या इमारतीला झाल्याने संपूर्ण इमारत खिळखिळी झाली आहे. इमारतीच्या पिलरला मोठे तडे गेल्याने धोका अजूनच वाढला आहे. या इमारतीत 4 कामगार काम करत असून, पावसाळ्यात कामगारांची संख्या वाढते. या केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी पालिका महिन्याला तब्बल 18 लाख रुपये खर्च करते, पण त्याची पाहणी कधी करत नसल्याने याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मलनिःसारण केंद्राच्या आजुबाजूला असलेल्या खदानीत मोठ्या प्रमाणात गाळ साठला असून, तो अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागात दुर्गंधीचेही मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे. मोठ्या पावसात जर मलनिःसारण केंद्र कोसळले तर या गाळात दबून अनेकांचे प्राण जाण्याची शक्यता स्थानिक कामगारांनी वर्तवली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना झाल्यावरच मनपा जागी होणार का? असा प्रश्न आहे.

- Advertisement -

या केंद्राच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असता त्यात ही इमारत अत्यंत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहे. गुरुवारी मलनिःसारण केंद्राच्या भागातून जाणारा पादचारी पूल अचानक कोसळला. त्यात दोघे जण गंभीर जखमी झाले. मनपा आयुक्त एन. रामास्वामी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी फक्त पुलाचीच पाहणी केली आणि निघून गेले. ऐन पावसाळ्यात ही इमारत कोसळली अथवा काही दुर्घटना घडली तर पावसाचे आणि भरतीचे पाणी नवी मुंबईकरांच्या घरात जाईल, असेही स्थानिक कामगाराने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -