घरमुंबईनिक्षयमुळे क्षयरुग्ण शोधण्यात यश

निक्षयमुळे क्षयरुग्ण शोधण्यात यश

Subscribe

खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा पाठिंबा

‘क्षयमुक्त भारत’ अशी घोषणा केंद्र सरकारने दिली असली तरी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची नोंद ठेवणे सरकारला शक्य होत नाही. त्यामुळे ‘क्षयमुक्त भारत’ मोहीम खासगी डॉक्टरांशिवाय शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर केंद्र सरकारने ‘निक्षय’ अ‍ॅप सुरू केला. ‘निक्षय’ अ‍ॅपला खासगी डॉक्टरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘निक्षय’ अ‍ॅपवर खासगी डॉक्टरांनी 2017 पासून आतापर्यंत देशभरातून तब्बल 10 लाख 26 हजार 540 क्षयरुग्णांची तर महाराष्ट्रात तब्बल 1 लाख 51 हजार 96 रुग्णांची नोंद केली आहे.

केंद्र सरकारने 2025 पर्यंत ’क्षयमुक्त भारत’चा नारा दिला. क्षयरुग्णांना मोफत औषधे, उपचार, चाचण्या व पोषक आहार मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी क्षयरुग्णांची खासगी व सरकारी हॉस्पिटलमधील रुग्णांची नोंद होणे गरजेचे आहे. क्षयग्रस्त रुग्णांकडे भारतात तुच्छतेने बघितले जाते. अनेकांना घरातून बाहेर काढून त्यांच्याशी संबंध तोडण्यात येतात.खासगी डॉक्टरही क्षयरोगग्रस्तांवर उपचार करण्याचे टाळतात. त्यामुळे केंद्र सरकारने क्षयरोगग्रस्तांची नोंद व्हावी यासाठी 2017 मध्ये ‘निक्षय’ अ‍ॅप सुरू केले.

- Advertisement -

सरकारी हॉस्पिटलसह खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणार्‍या क्षयरुग्णांची नोंदणीसाठी सुरु केलेल्या ‘निक्षय’ अ‍ॅपला खासगी डॉक्टरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2017 मध्ये सुरू केलेल्या अ‍ॅपवर प्रथम वर्षी खासगी डॉक्टरांनी तब्बल 3 लाख 91 हजार 661 रुग्णांची नोंद केली. यामध्ये महाराष्ट्रातील डॉक्टरांनी 68 हजार 458 इतक्या रुग्णांची नोंद केली. त्याखालोखाल उत्तर प्रदेश 67 हजार 440, बिहार 45419, गुजरात 39931, राजस्थान 23444 रुग्णांची नोंद झाली. पहिल्यावर्षी मिळालेल्या प्रतिसादानंतर 2018 मध्ये खासगी डॉक्टरांनी 5 लाख 42 हजार 122 रुग्णांच्या नोंदी निक्षयवर केल्या. 2018 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 1 लाख 14 हजार 871 क्षयरोग रुग्णांची नोंद खासगी डॉक्टरांनी केली.

क्षयरुग्णांची नोंद करणार्‍या डॉक्टरांना मानधन
खासगी डॉक्टरांकडून क्षयरुग्णांची नोंद व्हावी यासाठी त्यांना प्रत्येक रुग्णामागे एक हजार रुपये सरकारकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात नोंदी होत आहेत. तसेच आयएमएकडून डॉक्टरांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी राबवण्यात येणार्‍या विविध कार्यक्रमांनाही यश मिळत आहे.

- Advertisement -

निक्षय पोषण आहार योजना
क्षयरुग्णांना पोषक आहार मिळावा यासाठी नोंद केलेल्या रुग्णांच्या खात्यात सरकारकडून दरमहा 500 रुपये जमा करण्यात येतात.

आयएमने दरवर्षी नोंदवल्या न जाणार्‍या लाखो क्षयरोग रुग्णांची माहिती मिळवण्याचा निश्चय केला आहे. डॉक्टरांनी क्षयरोग रुग्णांची माहिती केंद्र सरकारला द्यावी यासाठी आयएमएकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. रुग्णांची माहिती मिळाल्यामुळे दर्जेदार निदान व उपचार केले जातात तसेच त्यांना पोषक आहारही मिळतो.- डॉ. आर. व्ही. असोकन,
सचिव, भारतीय मेडिकल असोसिएशन

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -