घरमुंबईसर्व्हरच्या गोंधळाने विद्यापीठाच्या परीक्षा हँग

सर्व्हरच्या गोंधळाने विद्यापीठाच्या परीक्षा हँग

Subscribe

विद्यार्थ्यांना मिळाला दोन तास उशीरा पेपर

प्रतिनिधी:-मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरत आहे. या अनागोंदी कारभाराचा फटका विद्यार्थी वर्गाला बसत असून गुरुवारी विद्यापीठात उद्भवलेल्या सर्व्हरच्या गोंधळामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची परीक्षा पणाला लागल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. गुरुवारी मुंबई विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे बीएसस्सीच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास उशीराने पेपर मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठाने मात्र फक्त अर्धा तास उशीराने पेपर परीक्षा केंद्रावर पोहचल्याचा दावा केला असून विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ दिल्याचे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाची हिवाळी सत्र परीक्षा सुरु आहे. गुरुवारी पार पडलेल्या द्वितीय वर्ष बीए, बीएस्सी, बीएमएम या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रश्नपत्रिकाच एक तास उशीराने मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. विद्यापीठाच्या विविध शाखांच्या द्वितीय वर्ष पदवीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा कॉलेजस्तरावर होत असल्या तरी याची प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून पाठविण्यात येणार होती. यामुळे कॉलेजांनी परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळ आधी प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यास सुरुवात केली मात्र सर्व्हरवर लोड आल्यामुळे ही साईट सुरू होऊ शकली नाही. प्राचार्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधून अडचण सांगितल्यानंतर अतिरिक्त क्षमतेच्या सर्व्हरची जोड देऊन वेबसाईट सुरू करण्यात आली. त्यावेळेस डाउनलोडिंग सुरू झाले. पण ही सर्व प्रक्रिया पार पडण्यासाठी वेळ गेल्यामुळे काही केंद्रांवर पाच मिनिटे तर काही केंद्रांवर तब्बल एक तास परीक्षा उशीरा सुरू झाली. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी त्यांना अतिरिक्त वेळ देण्यात आल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. जवळपास २ तासानंतर सर्व्हर योग्यरित्या सुरु असल्याची माहिती यावेळी कॉलेजांकडून देण्यात आली.

- Advertisement -

परीक्षा दोन तास उशीराने सुरु झाल्याचा दावा विद्यापीठाने फेटाळून लावला आहे. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाले म्हणाले की, अर्ध्या तासात हा गोंधळ सोडविण्यात आला होता. तर ज्या ठिकाणी पेपर उशीराने सुरु झाले होते त्याठिकाणी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तर या मुद्यावरुन युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी विद्यापीठ प्रशासनावर कडाडून टीका केली. मुंबईसारख्या शहरात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असतानादेखील अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर पुढे काय बोलणार. सर्व्हर गोंधळ होऊ नये म्हणून विद्यापीठाने पर्यायी व्यवस्था करायला हवी होती. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत विद्यापीठ गंभीर नसल्याने हे प्रकार घडत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. तर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -