संपलेल्या ठेक्यातील कर्मचारी पाहताहेत पालिकेचा कारभार

Mumbai
vasai virar corporation

वसई:- संपलेल्या ठेक्यातील दोन कंत्रांटी कामगार दादागिरी करून अत्यंत महत्वाचा असा महापालिकेतील अतिक्रमण विभाग चालवत असल्याची धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.वसई-विरार महापालिकेच्या आय प्रभागातील दोन कर्मचारी नागरिकांना उद्धट वागणूक देत असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते सुनील डिसील्वा यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी शहानिशा केल्यावर या तक्रारीत तथ्य असल्याचे निदर्शनास आले.अतिक्रमण विभागाचा कारभार सांभाळणारे दिपक राठोड आणि गौरव गोतावळे तक्रारदारांशी उद्धट वागत असतात,ते सहाय्यक आयुक्तांच्या आदेशालाही जुमानत नसल्याचे दिसून आले.त्यामुळे सुनील डिसील्वा यांनी माहिती अधिकारात राठोड आणि गोतावळे यांची माहिती विचारली असता,कर्मचार्‍यांच्या यादीतही त्यांची नावे नसल्याचे उघड झाले.

या प्रकरणी डिसील्वा यांनी सहाय्यक आयुक्तांकडे विचारणा केली असता,हे दोघे ठेका कर्मचारी होते. ठेका संपल्यानंतर दोन वर्षांपुर्वी तत्कालीन सहाय्यक आयुक्तेने त्यांना स्वतःकडे खाजगी कर्मचारी म्हणून ठेवून घेतले. सदर सहाय्यक आयुत्कंची बदली झाल्यानंतरही राठोड आणि गोतावळे यांनी आपला अनधिकृत कारभार सुरुच ठेवला आहे.अनधिकृत बांधकामांची तक्रार आल्यावर हे दोघे संबंधित बांधकामधारकाला तक्रारदाराची माहिती देतात.त्यामुळे परस्पर तक्रारदार आणि बांधकामधारक यांच्यात वाद होतो. गेली दोन वर्षे ते अतिक्रमणाचा कारभार सांभाळत असल्याची माहिती डिसील्वा यांना मिळाली.

त्यामुळे महापालिकेचा अनधिकृत कारभार पाहणार्‍या या दोघांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी डिसील्वा यांनी आयुक्तांकडे केली आहे. सहाय्यक आयुक्त रतेश किणी यांनीही या दोघांवर कारवाई करण्याचा अहवाल आयुक्तांना पाठवल्याची माहिती डिसील्वा यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here